Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 06:38 AM2019-09-18T06:38:00+5:302019-09-18T06:38:19+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़
उस्मानाबाद : मुख्यमंत्री म्हणत आहेत, मी पाच वर्षांतील कामांचा हिशेब द्यायला निघालोय. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे... पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़
माजी मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री हिशेब लिहून झाल्यावर तो जनतेला सांगायचे सोडून ९० टक्के भाषण माझ्यावरच करतात़ पवारांनी काय केले ते सांगा म्हणतात़ यंदा राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ बेरोजगारी वाढली, अनेकांच्या नोकºया गेल्या; याचा हिशेब कोण देणार, असा सवाल पवार यांनी केला. मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधी केले नाही़ उलट मी स्वत: नवीन
पक्ष काढले. पक्षांतर करणाऱ्यांनी किमान एवढे तरी करून दाखवायचे होते़ विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने ते लोक पळत आहेत. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांना सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही़ त्यांना आम्ही सन्मान दिला़ पहिल्या रांगेत बसविले़ आता ते अशा ठिकाणी गेलेत जिथे बस म्हटले की बसावे लागते़ स्वत:ला सिंह म्हणवून घेणारे देखील शहांच्या दर्शनाला गेले, असा टोला त्यांनी राणाजगजितसिंह यांना लगावला.
।राष्टÑवादीच्या सभेत मनसेचे गाणे!
सोलापूर येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमस्थळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या हे ’ हे गाणे लावण्यात आले होते.