Vidhan Sabha 2019: शिवसेना कमी जागांवर लढण्यास तयार; 'या' अटी अन् शर्ती लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:21 AM2019-09-24T04:21:27+5:302019-09-24T06:46:56+5:30
लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता
मुंबई : युतीमध्ये लहान भावाची भूमिका स्वीकारत कमी जागांवर समाधान मानताना शिवसेना राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या शिवसेनेचे दहा मंत्री असून, किमान १३ ते १४ मंत्रिपदे आपल्या वाट्याला यावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून भाजपला देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
भाजपने शिवसेनेला १२२ ते १२३ जागा देण्याची तयारी दर्शवल्याचेही समजते. मात्र, १२६ पर्यंत जागा व मंत्रिपदे वाढवून द्यावीत, यासाठी शिवसेना आग्रही आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाबाबत सोमवारीही चर्चा झाली. केंद्रातील वाटा वाढवून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मोदी मंत्रिमंडळात सध्या अरविंद सावंत हे शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावाला भाजपने अद्याप होकार दिलेला नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २६ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याने त्या दिवशी युतीची घोषणा होईल, असे म्हटले जात होते. आता शहा यांचा दौरा रद्द झाला आहे. युतीचा फैसला दिल्लीत होईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जातील, असेही म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय निवडणुकीचा मुद्दा असेल का, असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, हा विषय आमच्यासाठी देशप्रेमाचा, राष्ट्रीयत्वाचा आहे आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा घेण्यात काय गैर आहे?
मुख्यमंत्र्यांचे मौन
युती होणार की नाही, कोणता फॉर्म्युला ठरला? अशा प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिले नाही. ‘तुम्हाला युतीबाबत लवकरच समजेल,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत विचारले असता, ‘वाट बघा,’ असे ते म्हणाले.