Vidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम
By यदू जोशी | Published: September 22, 2019 05:01 AM2019-09-22T05:01:45+5:302019-09-22T06:27:16+5:30
युतीच्या जागावाटपाचा तिढा; मित्रपक्षांना १८ ऐवजी आता दहाच जागा
- यदु जोशी
मुंबई : भाजप १२० पेक्षा एकही जास्त जागा शिवसेनेला सोडायला तयार नाही; तर दुसरीकडे शिवसेना १२६ वर अडून बसली आहे. अशावेळी दोन्हींचा सुवर्णमध्य काढून शिवसेनेचे समाधान केले जाऊ शकते. हा आकडा १२० ते १२६ दरम्यान असेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली तरी युतीचे घोडे अडल्याने, युती होणार की नाही याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, युती १०० टक्के होणार असून येत्या तीन-चार दिवसांत त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने १२० जागा लढाव्यात, आम्ही लहान मित्रपक्षांसह १६८ जागा लढवू, अशी ठाम भूमिका भाजपने शिवसेनेला कळविली आहे. मात्र शिवसेना १२६ जागांवर अडून आहे. भाजपने १६८ जागा लढवून १४५ जागा जिंकल्या तर सरकार चालविताना मग शिवसेनेला विश्वासात घेण्याची त्यांना गरज राहणार नाही, अशी शंकायुक्त भीती शिवसेनेच्या गोटात आहे.
भाजप १७१ तर शिवसेना ११७ जागा असा फॉर्म्यूला ठरल्याचा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्टपणे इन्कार केला. शिवसेनेला १२०
जागा देण्याची आमची सुरुवातीपासूनच तयारी आहे, असे ते म्हणाले. लहान मित्रपक्षांसाठी भाजप १८ जागा सोडणार असे आतापर्यंत म्हटले जात होते. मात्र, आता शिवसेनेला १२० जागा देताना लहान मित्रपक्षांना (रिपाइं, रासप, शिवसंग्राम, अपक्ष आदी) १८ जागा सोडण्याच्या मूडमध्ये भाजप नाही. ही संख्या १० पर्यंत खाली येऊ शकते. त्यातही बहुतेक उमेदवार हे भाजपच्या कमळ चिन्हावरच लढतील.
मुख्यमंत्र्यांनी केले मतदारांना आवाहन
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आहे. निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. जनतेला आपले सरकार निवडून देण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. आपण सरकारकडून अनेक अपेक्षा करतो. एखाद्या निर्णयावर टीकाही करतो. अपेक्षा वा टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण अपेक्षा वा टीका करण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे मतदान करतात. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, २१ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात मतदान करावे आणि लोकशाहीच्या या महोत्सवाचे भाग व्हावे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री