शिवसैनिकांचं ठरलंय! युती झाली तरी 'या' मतदासंघात भाजपाविरोधात निवडणूक लढविणारच
By प्रविण मरगळे | Published: September 29, 2019 09:41 PM2019-09-29T21:41:16+5:302019-09-29T21:44:10+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं चित्र आहे.
प्रविण मरगळे
कल्याण - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याचं सुरु केलं आहे. भाजपाही लवकरच आपली उमेदवारी यादी जाहीर करेल. पण बंडखोरीच्या भीतीने या दोन्ही पक्षाने सध्या वेळकाढूपणाचं धोरण अवलंबलेलं दिसतंय.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं चित्र आहे. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त असल्याने हे मतदारसंघ शिवसेनेला सोडावे अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात विद्यमान नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार आहेत. मात्र कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा गड आहे. कारण २०१५ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २६ नगरसेवक आणि भाजपाचे ६ नगरसेवक या मतदारसंघातून निवडून आलेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी मनसे आमदार प्रकाश भोईर यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अरविंद मोरे, विश्वनाथ भोईर, रवींद्र पाटील आणि मयुर पाटील यांनी शिवसेनेला हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी केली आहे. तर कल्याण पुर्व मतदारसंघात अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केल्याने हा मतदारसंघ भाजपाला जाण्याची शक्यता आहे. याठिकाणीही गेल्या निवडणुकीत चांगली लढत पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार गोपाळ लांडगे यांचा ७७७ मतांनी पराभव झाला होता. तर राष्ट्रवादीकडून उभे राहिलेला निलेश शिंदे यांनाही चांगली मते मिळाली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. गेली २ टर्म ते या विभागात आमदार म्हणून कार्यरत आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून नगरसेवक महेश गायकवाड आणि रमेश जाधव हे इच्छुक आहे. या मतदारसंघात १६ नगरसेवक शिवसेनेचे आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र युतीत जर हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले नाहीत तर कोणत्याही परिस्थितीत इच्छुक उमेदवार भाजपाविरोधात निवडणूक लढविणारच असा निर्धार या इच्छुकांनी केला आहे अशी माहिती शिवसेनेचे कल्याण पुर्व आणि पश्चिम विधानसभेचे प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली आहे.