Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:04 PM2019-09-25T23:04:41+5:302019-09-26T06:52:39+5:30

भाजप-सेना युतीबाबत अद्यापि ठोस निर्णय झालेला नाही

Maharashtra Vidhan Sabha 2019 Shri Ganesha propagating alliance through Mathadi rally? | Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा?

Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा?

Next

नवी मुंबई : तुर्भे येथील एपीएमसीत पार पडलेल्या माथाडी मेळाव्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण भाजप-सेना युतीबाबत अद्यापि ठोस निर्णय झालेला नाही. परंतु बुधवारच्या मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकसुरात माथाडी कामगारांना सज्ज राहण्याचे आवाहन करीत अप्रत्यक्षरीत्या युतीवर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.

माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त बुधवारी तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडींच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना हात घातला. हे व्यासपीठ असेच कामगारांचे राहील, कोणतीही फूट न पडता पूर्णपणे ताकदीने या चळवळीच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चालविलेल्या चळवळीला सरकारने आरक्षण देऊन मानवंदना दिली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नरेंद्र पाटील यांनी माथाडी संघटना सक्षमपणे सांभाळल्याचे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी यावेळी काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी माथाडीच्या रूपाने मुंबईतील मराठी माणसाला एकत्र ठेवण्याचे काम केल्याचे ठाकरे म्हणाले. थोडा आधी निर्णय घेतला असता तर नरेंद्र पाटील आज खासदार असते. मात्र माथाडी नेत्याच्या सुपुत्राला खासदार करणारच असा निर्धार यावेळी ठाकरे यांनी बोलून दाखवला.

माथाडी नेते तथा अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरांना वाढीव एफएसआय मिळावा, घरांमध्ये सवलती देण्यात याव्यात अशा विविध मागण्या केल्या. एपीएमसी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आरक्षण मिळाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माथाडी युनियन, माथाडी पतपेढी यांचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
‘तेजोमय संघर्षाची सुवर्ण वाटचाल’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच गुणवंत कामगार पुरस्कार वितरण, माथाडी चळवळीला साथ देणाऱ्या कार्यकर्ते व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्र माला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे संचालक प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, विजय सावंत, रमेश शेंडगे, सुभाष भोईर, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नहाटा, प्रसाद लाड, रामचंद्र घरत, एपीएमसीचे प्रशासक सतीश सोनी, गुलाबराव जगताप आदी मान्यवर आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Shri Ganesha propagating alliance through Mathadi rally?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.