Vidhan Sabha 2019: 'त्या' जागा शिवसेना सोडेना अन् 'या' जागा भाजपा देईना; जागावाटपाचं गणित सुटता सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:16 AM2019-09-28T03:16:51+5:302019-09-28T06:51:17+5:30
आज शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई : भाजप-शिवसेना युतीची जागावाटपाची बोलणी सुरूच असून युतीचे घोडे अडलेलेच आहे. सेनेला १२६ जागा देण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे भाजपतर्फे सांगण्यात आले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकारी व इच्छुकांची बैठक मुंबईत बोलविली आहे.
शिवसेनेला १२० पेक्षा अधिक जागा सोडणार नाही, असा पवित्रा भाजपने कायम ठेवला असला, तरी त्यापेक्षा आणखी फारतर दोन ते तीन जागा सोडण्यास भाजप तयार होईल, असे म्हटले जाते. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, युती कोणाला किती जागा द्यायच्या, यापेक्षा अडली आहे ती दोघांनाही हव्या असलेल्या जागांवरून. भाजपला हव्या असलेल्या पाच ते सहा जागा अशा आहेत की, ज्या शिवसेना सोडायला तयार नाही. शिवसेनेलाही हव्या असलेल्या पाच ते सहा जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यात वडाळा; मुंबई, ऐरोली, बेलापूर; नवी मुंबई, औसा; जि.लातूर, बडनेरा; जि.अमरावती, अकोट वा बाळापूर; जि.अकोला या जागांचा समावेश आहे.
भूमिकेकडे लक्ष
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बोलविलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिलेले इच्छुक उपस्थित राहतील. युतीबाबत या बैठकीत ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.