Vidhan Sabha 2019: शिवसेनेची ताठर भूमिका, 'या' जागांवरुन युतीमध्ये कमालीचा तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:55 AM2019-09-25T03:55:43+5:302019-09-25T07:03:15+5:30
आता मध्यस्थाची मदत; जागावाटपाचा तिढा कायम
मुंबई : भाजप-शिवसेनेची युती पक्की असल्याचे दोन्ही बाजूंचे नेते सांगत असताना प्रत्यक्षात जागा सोडण्यावरून तणाव आहे. एकेका जागेसाठी शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने चर्चेबाबत संयम तरी किती ठेवायचा, असा सवाल भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चर्चेची सूत्रे हाती घेतली असून, नीरज गुंडे नावाच्या मध्यस्थाची मदतही घेतली जात आहे.
युती होत आली की, सेनेकडून मान्य न होणाऱ्या गोष्टी मागितल्या जातात. एकेका जागेचा तिढा चार-चार तास चर्चा करूनही सुटणार नसेल, तर अवघड आहे. जिथे उमेदवार नाही, तिथेही जागा मिळण्याबाबत शिवसेना अडून बसणार असेल, तर अवघड आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अशीच उद्विग्नता शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. शिवसेनेला हक्काच्या जागाही भाजप मागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सेनेला १२० ते १२५ पर्यंत जागा दिल्या जातील, हे जवळपास पक्के आहे. किमान १५ जागांवरून युतीत तणाव आहे. नागपूर, पुणे, अकोला, नाशिकमध्ये जागा न देण्याच्या भाजपच्या भूमिकेने सेनेत अस्वस्थता आहे, तर मराठवाड्यातील तीन जिल्हे, सोलापूर, मुंबई, कोकणात भाजपला जागा सोडायला सेना तयार नाही.
मध्यस्थ म्हणून काम करणारे नीरज गुंडे रा. स्व. संघाचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचेही विश्वासू आहेत.
भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते कोअर कमिटीने जाणून घेतली. त्यांनी कोणती जागा शिवसेनेला सोडा वा सोडू नका, याबाबत मत दिले. भाजपची उमेदवारी कोणाला द्यावी, यावरही स्पष्ट मत दिले. सेनेला हव्या असलेल्यांपैकी किमान २० जागा सोडण्यास त्यांनी विरोध दर्शविला.
फाळणीपेक्षाही कठीण-राऊत
भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जेवढ्या वाटाघाटी झाल्या नसतील, तेवढ्या युतीच्या जागावाटपासाठी होत आहेत. सत्तेत सहभागी होण्याऐवजी विरोधी पक्षात असतो, तर स्वबळावर सरकार आणले असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली.
युती नक्की होणार - पाटील
युतीची चर्चा योग्य दिशेने सुरू आहे आणि ती नक्की होईल. युती होऊ नये, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्यांना कुठलाही आनंद मिळणार नाही. युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. कुठल्याही क्षणी जागावाटपाबाबत एकमत होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राणेंबाबत मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी होईल, या प्रश्नात चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही गोष्टी मित्रपक्षाशी बोलून ठरवाव्या लागतात. याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करीत आहेत.