Vidhan Sabha 2019: वंचित बहुजन आघाडी देणार २५ मुस्लीम उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:29 AM2019-09-20T05:29:19+5:302019-09-20T05:29:40+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. एमआयएमसोबत आघाडीचे दरवाजे अद्याप खुले असल्याचे सांगतानाच आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष लोकसभेपूर्वी एकत्र आले होते. राज्यातील काही मतदारसंघांत या आघाडीच्या उमेदवारांनी चमकदार कामगिरीही केली. विधानसभेतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएमने वंचितचा पाठिंबा काढून घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी किमान २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे आॅल इंडिया उलेमा बोर्डानेही आज वंचित बहुजन आघाडीला सशर्त पाठिंबा जाहीर केला. वंचितची सत्ता आल्यास मुस्लिमांना शिक्षणात दहा टक्के आरक्षण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमित जमिनी बोर्डाला परत करणे, मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा बनविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उलेमा बोर्डाने वंचितला आपला पाठिंबा जाहीर केला. उलेमा बोर्डाशी चर्चा करूनच २५ मुस्लीम उमेदवारांची नावे नक्की करणार असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
एमआयएमसोबतच्या आघाडीबाबत विचारले असता, त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडेच आहेत. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, हीच आमची भूमिका असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.