Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:43 AM2019-09-27T02:43:35+5:302019-09-27T06:42:16+5:30

राज्यमंत्री रणजीत पाटील अकोटमधून; तर प्रवीण पोटे तिवसामधून लढणार

Maharashtra Vidhan Sabha 2019 Vidhan Sabha nomination for most BJP ministers | Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

Next

- यदु जोशी

मुंबई : भाजपच्या राज्यातील बहुतेक मंत्र्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. एखादे नाव अपवादानेच वगळले जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढतील वगैरे चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ते दक्षिण-पश्चिम नागपूरमधूनच लढतील. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे (बोरीवली), ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (परळी), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (जामनेर), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (परतूर), सहकार मंत्री सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण), गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी; नागपूर), पर्यटन मंत्री जयकुमार रावल (शिंदखेडा), अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), कामगार मंत्री डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद), शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार (वांद्रे; मुंबई), कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे (वरुड-मोर्शी), सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे (मिरज), आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके (राळेगाव), राज्यमंत्री मदन येरावार (यवतमाळ), विजय देशमुख (सोलापूर उत्तर), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), राज्यमंत्री बाळा भेगडे (मावळ), राज्यमंत्री अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील. राज्यमंत्री विद्या ठाकूर (गोरेगाव) यांच्याशिवाय अन्य पर्यायांवरही पक्ष विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. पण त्या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

गृह राज्यमंत्री रणजित पाटील विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना अकोट मतदारसंघातून रिंगणात उतरविण्याचा विचार सुरू आहे. त्यांनी स्वत:ही लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तीन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात संधी दिली जावू शकते पण ते स्वत: लढण्यास इच्छुक नसल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री व पक्षाला दिल्याची चर्चा आहे. तरीही पक्ष त्यांच्यासाठी आग्रही आहे. माजी राज्यमंत्री अंबरिशराजे आत्राम (अहेरी, जि.गडचिरोली) यांना पुन्हा संधी देण्याबाबत साशंकता आहे.

चंद्रकांत पाटील लढणार नाहीत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा असली तरी तशी शक्यता दिसत नाही. पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील ५६ जागांव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याची जबाबदारी असल्याने त्यांना पक्ष एका विधानसभा मतदारसंघात अडकवून ठेवण्याची शक्यता कमी आहे. त्या बाबतचा निर्णय त्यांनी पक्ष नेतृत्वावर सोडला आहे.

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना विक्रमगडमधून (जि.पालघर) पुन्हा संधी दिली जाणार नाही. ते त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे म्हटले जाते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (मुक्ताईनगर), सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव) यांना पुन्हा संधी मिळू शकते.

युतीमध्ये वाट्याला येणाऱ्या जागांपैकी जास्तीतजास्त जागा निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रस्थापित नेते, मंत्री यांच्यापैकी कोणाला संधी नाकारण्याच्या मन:स्थितीत पक्ष
दिसत नाही.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Vidhan Sabha nomination for most BJP ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.