Vidhan sabha 2019 : मतदार वाढले, पण मतांच्या टक्केवारीची झोळी फाटकीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:57 AM2019-09-30T00:57:48+5:302019-09-30T00:58:10+5:30
एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मांडली.
- प्रशांत माने
एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मांडली. पथनाट्ये, स्वाक्षरी मोहीम आणि अन्य मोहीमांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. परंतु मतदानाच्या दिवशी मात्र जेवढा मतदानाचा टक्का दिसायला हवा होता तेवढा दिसला नाही. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का केवळ ३ टक्क्यांनी वाढला. राज्यात व देशात मतदानाची टक्केवारी लक्षणिय वाढली असताना कल्याण-डोंबिवली या सुशिक्षितांच्या शहरात मतांची टक्केवारी जेमतेम असावी ही चिंतेची बाब ठरली. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेली नवमतदारांची नोंदणी चार मतदारसंघात वाढली आहे. परंतु मागील २००९ आणि २०१४ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी पाहता ज्याप्रमाणात मतदार नोंदणीचे प्रमाण वाढले त्याप्रमाणात विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही.
लोकसभा, विधानसभा अथवा महापालिका यापैकी कोणतीही निवडणूक असो, येथील मतदानाची कमी टक्केवारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ उदयास आला तर दुसरीकडे कल्याण विधानसभेचे विभाजन होऊन डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण असे चार विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. कल्याण लोकसभेच्या निर्मितीपासूनचा आढावा घेता २००९ च्या पहिल्या निवडणुकीत ३४.३० टक्के मतदान झाले होते. २०१४ ला ४२.८८ तर नुकत्याच एप्रिल-मे मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. ३१ जानेवारीपर्यंत या मतदारसंघात ३८ हजार नवमतदारांची नोंद झाली होती. त्यात राजकीय पक्षांकडून मतदान करा, असे आवाहन केले गेले असताना मतदानाच्या दिवशी एकही मतदार मागे राहू नये यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रमही राबविण्यात आले होते. आयोगाकडून मतदानवाढीसाठी विशेष मेहनत घेतली गेली होती. मतदारसंघातील विविध प्राधिकरणांकडून जनजागृतीसाठी मोहीमा राबवल्या गेल्या.
त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम, बॅनर, होर्डिंग्ज, पथनाट्ये, सायकल रॅली, चुनाव पाठशाला आदी उपक्रम राबविण्याबरोबरच केडीएमसीच्या वतीने गुढीपाडव्याला निघालेल्या नववर्ष स्वागतयात्रेत ‘मतदान करा’ असा संदेश देण्यात आला होता. मतदानात प्रत्येक घटकाचा समावेश असावा याकरिता विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी झालेल्या मतदानाचा आकडा पाहता २०१४ च्या मानाने २०१९ मध्ये केवळ तीन टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून आले. अलीकडेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. शुक्रवारपासून निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला आहे. ७ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याने राजकीय पक्षाला निवडणुकीच्या प्रचारासाठी फारच थोडा अवधी मिळणार आहे. २१ आॅक्टोबर मतदानाचा दिवस तर मतमोजणी २४ आॅक्टोबरला होणार आहे. २००९ आणि २०१४ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेता कल्याण पश्चिम, पूर्व, ग्रामीण आणि डोंबिवली या चारही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ही ४४ ते ४७ टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा ३१ आॅगस्टपर्यंत झालेल्या मतदारनोंदणीत चारही मतदारसंघात नवमतदारांचा आकडा वाढला आहे. एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोंद झालेल्या मतदारांच्या तुलनेत विधासभेच्या कल्याण पश्चिममध्ये १५ हजार, कल्याण पूर्वेत चार हजार, कल्याण ग्रामीणमध्ये ११ हजार तर डोंबिवली मतदारसंघात सात हजार मतदार वाढले आहेत ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु मतदारांची ही वाढलेली संख्या प्रत्यक्ष मतदानात दिसणे आवश्यक आहे. पण तेवढा उत्साह दिसून येत नाही.
कल्याण डोंबिवली ही सुशिक्षितांची शहरे आहेत पण उर्वरीत ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी ५७ ते ६९ टक्क्यांपर्यंत जात असताना इथेच ती पन्नाशी गाठण्यापूर्वी धापा टाकते हे वास्तव आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध क्लृप्त्या लढवून निवडणूक आयोगातर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. मतदारांना त्रास होऊ नये म्हणून यंदा सर्वच ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असावीत असा निर्णय आयोगाने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पुन्हा एकदा मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे ही काळाची गरज आहे हे आपण विसरून चालणार नाही. एका दिवसाच्या मतदानाने आपल्याला पाच वर्षाची भूमिका मांडायची असते आपल्या अवतीभवतीचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी निश्चित भूमिका मतदानातून घेणे आवश्यक आहे. आपल्यातील उदासिनतेमुळे चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्याचे परिणाम पुढील पाच वर्षे आपल्याला भोगावे लागणार आहेत हे तितकेच खरे.
कल्याण व डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नोंदणी लक्षणीय आहे. मात्र हे नोंदणी केलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठे जातात. या दोन्ही शहरांमधील मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपासही जात नाही. सुशिक्षितांच्या शहरातील मतदार आपल्या लौकिकास साजेसे वर्तन का करीत नाहीत, हाच प्रश्न आहे.