Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 08:45 AM2024-11-17T08:45:18+5:302024-11-17T08:49:00+5:30
"भाजप ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. गुतंवणूक, उद्योग, रोजगार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रासाठी काय करता येईल, यावर चर्चा होऊ शकते. मात्र, भाजपला या मुद्यावर चर्चा करायची नाही", असे सचिन पायलट म्हणाले.
अमिताभ श्रीवास्तव, छत्रपती संभाजीनगर
Sachin Pilot Interview : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट राज्यभर पक्षाचा जोरदार प्रचार करत आहेत. भाजप ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’या सारख्या घोषणांमधून भाजपची अस्वस्थता दिसत आहे. गुतंवणूक, उद्योग, रोजगार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काय करता येईल, यावर चर्चा करण्याची गरज पायलट यांनी व्यक्त केली.
प्रश्न : प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असून तुम्हाला काँग्रेसची स्थिती कशी वाटते ?
उत्तर : महाराष्ट्रात सुरुवातीपासून काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे, असे मला वाटते. राज्यातील शेतकरी व युवकांना बदल हवा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन करेल.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीनंतरचा उत्साह या निवडणुकीतही कायम आहे का? जागावाटपावरून ओढाताण झाली?
उत्तर : उत्साह नक्कीच कायम आहे. या विधानसभेत लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक बहुमत मिळेल. जागावाटपाचे काम खूप किचकट असते. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करत जागावाटप केले. कोणाच्या वाट्याला कमी जागा आल्या तर कोणाला जास्त. मात्र, आम्हाला राज्यात सत्तापरिवर्तन हवे आहे. आमच्यात कोणीही मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत नाही.
प्रश्न : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात २८८ जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आघाडीसोबत गेल्याने काँग्रेसचे नुकसान झाले, असे वाटते का?
उत्तर : प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला वाटते पक्षाने सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवावी. त्यात काही गैर नाही. मात्र, ही इंडिया आघाडी आहे. भाजपला बहुमतापासून रोखणे हा आघाडीचा उद्देश होता. इंडिया आघाडीमुळे भाजपला बहुमत मिळवता आले नाही. याच भावनेतून आम्ही महाराष्ट्र व झारखंडमध्ये निवडणूक लढवत आहोत.
प्रश्न : महाराष्ट्रात बंडखोर उमेदवार खूप असून जागावाटपाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली काँग्रेसने काम केल्याचे बोलले जात आहे?
उत्तर : यात काहीही तथ्य नाही. आम्ही सन्मान-आदर व एकमेकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला. काँग्रेस १३० वर्षांपूर्वीचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवसेना पक्षाचे स्वत:चे स्थान आहे. आम्ही परस्परांची चर्चा करून संयुक्त प्रचार करत असून महाविकास आघाडी मजबूत करत आहोत.
प्रश्न : छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा जागांवर अल्पसंख्याक उमेदवारांची नेहमी मागणी केली जाते. ही मागणी का पूर्ण होत नाही ?
उत्तर : काँग्रेसला केवळ अल्पसंख्याक समाजाची नाही तर सर्व समाजाची मते मिळतात. केवळ जात किंवा ठराविक समाजाची मते मिळवणारा तो प्रादेशिक पक्ष नाही. आम्ही लोक समाज व धर्म बघत नाही.
प्रश्न : महाराष्ट्रात इंडिया आघाडी पूर्ण सहमतीने निवडणूक लढवत आहे, असे म्हणता येईल का?
उत्तर : होय, आम्ही आपापसातील सहमतीने विजयी होण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर वेगळी गोष्ट होती. मात्र, भाजप ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. गुतंवणूक, उद्योग, रोजगार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रासाठी काय करता येईल, यावर चर्चा होऊ शकते. मात्र, भाजपला या मुद्यावर चर्चा करायची नाही. बटोगे तो कटोगे’ ऐवजी मी ‘पढ़ोगे तो बढ़ोगे’असे म्हणेल.
प्रश्न : महायुती सरकारने आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात लाडकी बहिणसह आणखी काही योजना सुरू केल्या आहेत. त्याचा निवडणूक निकालावर काही परिणाम होईल का?
उत्तर : राज्य सरकारने आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या महिन्यात या योजनांची घोषणा केली. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना सुरू केल्या हे सर्वांच्या लक्षात आले आहे.
प्रश्न : काँग्रेस सरकारही या योजना सुरू करण्यासंदर्भात बोलत आहे?
उत्तर : तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. तेव्हा आम्ही या योजना सुरू केल्या असून पाच वर्षे त्या चालवणार आहोत. कर्नाटक व हिमाचल प्रदेशातही पक्षाने या योजना सुरू केल्या.
प्रश्न : निवडणुकीत भरपूर पैसा येतो. निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकल्या जातात, याबद्दल काँग्रेसला काय वाटते?
उत्तर : निवडणुकीपूर्वी आमची बँक खाती सील करण्यात आली होती. ती सुरू करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँडला बेकायेदशीर ठरवले. मात्र, निवडणूक रोख्यांमधून मिळवलेला पैसा भाजपकडे आहे. आम्ही मात्र आमच्या संघटनेच्या बळावर काम करतो.
प्रश्न : महाराष्ट्रात एमआयएम व वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष आहेत. त्यांच्यामुळे निवडणुकीत वेगळे समीकरण तयार होते, त्याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : मुख्य लढत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आहे. त्यामुळे लोक विचारपूर्वक मतदान करतील. आपले मत वाया घालवणार नाहीत. खरे तर सर्वांना निवडणूक लढवण्याची मोकळीक आहे. लोकांना सर्वांचा अजेंडा लक्षात येतो. निवडणूक जिंकणे व सरकार बनवणे हा आमचा अजेंडा आहे.