Maharashtra Vidhan Sabha 2024: तिरंगी लढतीत कोणाचा लागणार 'निकाल'? तीन मतदारसंघात चित्र काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:55 AM2024-11-11T11:55:47+5:302024-11-11T12:00:12+5:30
Maharashtra Vidhan Sabha Eleciton 2024: साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणूक लढवत आहेत.
गोपालकृष्ण मांडवकर, भंडारा
Maharashtra Election 2024: जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदारसंघांत यावेळी लढत चुरशीची आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांचे कडवे आव्हान स्वीकारून विजयाचा झेंडा रोवणे म्हणावे तेवढे सोपे नाही, हेच सध्यातरी दिसत आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या पूजा ठवकर यांच्यापुढे स्वपक्षातीलच प्रेमसागर गणवीर आणि उद्धवसेनेचे नरेंद्र पहाडे या दोन बंडखोरांचे आव्हान आहे. साकोलीत महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यापुढे भाजपातील बंडखोर सोमदत्त करंजेकर यांचे आव्हान आहे. माजी आमदार बाळा काशीवार हे पाठीशी असल्याने करंजेकर यांना बळ मिळाले आहे.
तुमसर मतदारसंघात महाविकास आघाडीचे चरण वाघमारे यांच्याविरुद्ध स्वपक्षातील ठाकचंद मुंगुसमारे यांची अपक्ष उमेदवारी आहे. भंडाऱ्यात नरेंद्र भोंडेकर आणि साकोलीत नाना पटोले यांच्याविरुद्ध बंडखोरी नाही. मात्र, नाना पटोले यांनी मांडलेली समिकरणेच त्यांची डोकेदुखी आहे. एकीकडे जातीय समीकरणाची जुळवाजुळव आणि दुसरीकडे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी सामना आहे.
विकासाचे मुद्दे प्रचारात मागे
विकासाचे अनेक मुद्दे सर्वच मतदारसंघांत असले तरी प्रचारात मात्र ते मागे पडलेले दिसत आहेत. विकासापेक्षा प्रत्यक्ष संपर्कावर आणि जातीय राजकारणाच्या तडजोडीवर सर्वांचा भर आहे.
मुख्यमंत्री वगळता अद्याप कुण्या मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत. मात्र, अपक्ष उमेदवारांचे प्रचार भोंगे मतदारसंघातील समस्या मांडत असल्याचे चित्र आहे.
सर्वांनाच करावी लागणार नाराजांची मनधरणी
साकोलीत भाजपमध्ये उघड बंडखोरी आहे. नाराजांची मनधरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला करावी लागणार आहे. तुमसरमध्ये महाविकास आघाडीतील नाराजांचा गट आणि कार्यकर्ते अद्यापही प्रचारापासून दूर आहेत. भंडारा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते अद्याप ताकदीने उतरलेले दिसत नाहीत.
जातीय समीकरण आणि त्रिकोणी लढत
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत त्रिकोणी लढतीचे चित्र आहे. यात जातीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. तुमसर मतदारसंघात कुणबी, पोवार आणि तेली व त्या खालोखाल दलित व मुस्लीम मतदारांचे संख्याबळ अधिक आहे.
भंडारा मतदारसंघात दलित मतदार प्रभावी आहे. त्या खालोखाल कुणबी व तेली मतदारांचा क्रम आहे. साकोलीत कुणबी व तेली मतदारांचे प्राबल्य अधिक आहे.
दलित व अल्पसंख्याक मतेही प्रभावी ठरणारी आहेत. या सोबतच तिन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपाची ताकद दुर्लक्षित करण्यासारखी नाही. अपक्षांच्या अधिक संख्येमुळे मतविभागणी नुकसानकारक ठरू शकते.