Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

By किरण अग्रवाल | Published: November 18, 2024 08:54 AM2024-11-18T08:54:08+5:302024-11-18T08:58:38+5:30

विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी.

Maharashtra Vidhan Sabha 2024: Will 'Mahayuti' dominate North Maharashtra?  | Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

किरण अग्रवाल
जळगाव : महायुतीचे व त्यातही भाजपचे वर्चस्व असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात यंदा महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्वेषाने निवडणुकीला सामोरे जाताना दिसतो आहे खरा, परंतु बहुसंख्य ठिकाणी झालेली मातब्बरांची बंडाळी पाहता अनपेक्षितपणे कोणाची गणिते बिघडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरून गेले आहे.

विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी. एकेकाळी असलेला काँग्रेसचा वरचष्मा बाजूस करीत अन्य राजकीय प्रवाहांनाही संधी देऊन पाहणारा हा विभाग आहे. शेतीसंबंधित कापूस, केळी, द्राक्ष, कांदा, उसाचे व दुधाचे प्रश्न येथे आहेत तसे थबकलेल्या औद्योगिकीकरणाचेही विषय आहेत. पण, निवडणूक ‘एक है तो सेफ है’ आणि फतव्यांवर आधारित होऊ पाहते आहे. अशावेळी लोकसंग्रह व विकासाच्या बळावर दीर्घकाळ लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व अरुणभाई गुजराथी यांच्यासारख्यांचे नेतृत्व अधोरेखित होऊन गेल्याखेरीज राहत नाही.

छगन भुजबळ, बाळासाहेब थाेरात, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, दादा भुसे आदी ज्येष्ठ नेते पुन्हा रिंगणात आहेतच; शिवाय मातब्बर राजकीय घराण्यांची पुढची पिढी रिंगणात आहे. त्यामुळे पक्ष बदलले गेले असले तरी आपापले गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात काही जागांवर ‘माधव’ फॅक्टर पुन्हा चर्चेत आला आहे तर जरांगे फॅक्टरच्या उपयोगाचा व मतविभाजनातून लाभाचा विश्वास काही जणांना आहे. अर्थात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा भाजपाला व उर्वरित सहा जागा महाविकास आघाडीला मिळाल्याने सद्यस्थितीत विधानसभेत असलेले विभागातील ‘महायुती’चे प्राबल्य राखले जाणार का? याची उत्सुकता आहे.

कोणता पक्ष किती जागा लढवतोय?

महायुती
भाजप    २१
शिंदेसेना     १३
अजित पवार गट     १४
महाविकास आघाडी
काँग्रेस    १५
उद्धवसेना     १३
शरद पवार गट     १७
सहयोगी पक्ष     ०२
(महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील देवळालीमध्ये व अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे तर मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार नाही.)

महाविकास आघाडी अनुकूल बाबी

- महायुतीच्या बंडखोरांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ.

- मुस्लिम आदीवासींची पारंपारिकते सोबतच आणखी एकवटलेली 
एकगट्टा मते.

- लोकसभा निवडणूकीत लाभलेल्या यशामुळे प्रस्थापितांना धक्का देवू शकण्याचा वाढलेला आत्मविश्वास.

महाविकास आघाडी प्रतिकूल बाबी

- अहिल्यानगर जिल्ह्यातील थोरातांचा अपवाद वगळता अन्य जिल्ह्यात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव.
- राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभांखेरीज अन्य स्टार प्रचारकांच्या संपूर्ण विभागात फारशा न झालेल्या जाहीर सभा.

महायुती अनुकूल बाबी

- शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात मिळालेला विकासनिधी, पर्यटन विकासाला मोठी चालना.

- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिला मतदारांमध्ये दिसून येणारे समर्थन.

- संपूर्ण विभागासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘नारपार’ योजनेच्या आराखड्याला केंद्राची मान्यता.

महायुती प्रतिकूल बाबी 

-लोकसभेला त्रासदायी ठरलेला कांद्याच्या दराचा प्रश्न निकाली, पण कापूस, सोयाबीनचे दर कमीच. 

- आयटीपार्क, लाॅजिस्टीक हब, टेक्सटाईल क्लस्टर, केळी प्रक्रिया उद्योगसारख्या विषयांची अद्याप न झालेली सोडवणूक.

संसदेतून विधानसभेकडे!

अनेक मातब्बरांचे बंड शमविण्यात विशेषत: महायुतीला यश आले नाही त्यामुळे महायुतीचे तीन माजी खासदार नांदगाव, अक्कलकुवा व एरंडोलमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात कायम आहेत. एक माजी खासदार चाळीसगाव येथे उद्धवसेनेतर्फे रिंगणात आहेत.

चित्र कसे बदलत गेले....

प्रारंभापासून काँग्रेसचा प्रभाव राहिला. समाजवादी, कम्युनिस्ट व जनसंघाने वेळोवेळी लढत दिली, तरी दीर्घकाळ हा प्रभाव टिकून होता.

१९९०नंतरच्या दशकात शिवसेना व भाजपने बऱ्यापैकी पाय रोवले, तर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने विशेषत: तत्कालीन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांत जम बसविला. आता राष्ट्रवादीतही दुभंग घडल्यावर शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तेथे हा गट अधिक जागा लढतो आहे.

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातही प्रारंभी पूर्णतः काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. १९९५ मध्ये विजयकुमार गावित अपक्ष म्हणून निवडून आले आणि पुढे मंत्रीही बनले. त्यानंतर गावित विरुद्ध काँग्रेस असा राजकीय संघर्ष सुरू झाला.

२०१४ मध्ये मोदी लाटेत पहिल्यांदा नंदुरबार काँग्रेसचा गड ढासळून गावित यांची कन्या हिना गावित खासदार म्हणून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या आणि काँग्रेसच्या बरोबरीने भाजप प्रस्थापित झाली.

२०१४ मध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. तेव्हा भाजपाने १९ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसने १०, तर शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी आठ जागा मिळविल्या.

२०१९ मध्ये भाजपाने पुन्हा सर्वाधिक १६ जागा मिळविल्या. युतीमधील एकीकृत शिवसेनेला ८ जागा लाभल्या होत्या. आघाडीत १३ जागा मिळवून राष्ट्रवादी मोठा भाऊ ठरला होता, तर काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या.

जनता दल, शेकाप, माकपा, सपा, जनसुराज्य आदी पक्षांनीही वेळोवेळी अल्पसे यश मिळविले असताना २०१९च्या निवडणुकीत मालेगाव मध्य व धुळे शहर या दोन जागा मिळवून ‘एआयएमआयएम’नेही चंचूप्रवेश केला आणि एकगठ्ठा मतांची समीकरणे चर्चेत आली.

२०२४च्या निवडणुकीत शरद पवार गट व उद्धवसेनेचा नंदुरबार जिल्ह्यात, तर अजित पवार गटाचा धुळे जिल्ह्यात एकही उमेदवार नाही. वंचित बहुजन आघाडी, मनसे, बसपा, प्रहार आदी अन्य पक्षांनी मात्र काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील  लक्ष्यवेध

विभागातील आठपैकी तब्बल सहा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार.

समीर भुजबळ, हिना गावीत, उन्मेश पाटील, ए.टी.पाटील असे चार माजी खासदार आमदारकीसाठी रिंगणात. 

अहिल्यानगर जिल्ह्यात मातब्बर राजकीय घराण्यांमधील दुसऱ्या  पिढीतील उमेदवारांची संख्या  आहे सर्वाधिक.

नंदुरबार जिल्ह्यातील चार जागांवर डॉ. विजयकुमार गावीत यांच्या कुटुंबातील चार उमेदवार रिंगणात.

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघातून ‘वंचित’तर्फे नशीब आजमावतेय राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2024: Will 'Mahayuti' dominate North Maharashtra? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.