सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 06:47 AM2022-07-05T06:47:01+5:302022-07-05T06:47:54+5:30

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले.

Maharashtra Vidhan Sabha: A vision of civilization from the leaders of all parties | सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

googlenewsNext

यदु जोशी 
मुंबई : गेल्या १४ दिवसांतील सत्तांतराच्या प्रचंड घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, धमक्यांचे सत्र व त्यातून आलेली कटूता, असे एकूणच वातावरण राज्यात असताना या सत्तांतराला पूर्णविराम देणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी बोलताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभ्यता व सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत देशासमोर आदर्श निर्माण केला.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण तर अप्रतिम होते. ‘मी पुन्हा येईन या वाक्याची टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे..., असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा कोणता बदला ते घेणार, असा प्रश्न पडला पण पुढच्या सेकंदात त्यांनी दिलेले उत्तर सहृदयतेचे व निरागसतेचे दर्शन घडविणारे होते. ते म्हणाले, ‘टिंगलटवाळी करणाऱ्यांना मी माफ केले, हाच माझा बदला’. आपल्याविषयी काहीबाही बोलणाऱ्यांबद्दल निकोपता ठेवणारे त्यांचे हे वाक्य सर्वांची  मने जिंकणारे होते.

सत्ता गेली, पक्षही फुटल्याचे खापर फोडत शिंदे आणि समर्थक आमदारांवर आक्रस्ताळेपणाने तुटून पडण्याची भूमिका आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांनी घेतली नाही. भास्कर जाधव मात्र आक्रस्ताळे वाटले. अजित पवार यांच्या भाषणातही आकसाचा लवलेश नव्हता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात शिवसेनेत झालेल्या खच्चीकरणाची खंत होती पण शिवराळ भाषा, अरेरावीचे शब्द नव्हते. वागण्याबोलण्यात जाणवणारी कळकळ होती. पहिल्यावहिल्या भाषणाने त्यांनी राज्याला जिंकले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha: A vision of civilization from the leaders of all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.