ठाकरे सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:37 AM2021-07-05T11:37:16+5:302021-07-05T11:38:44+5:30
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan : राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजात तारांकित प्रश्न आणि प्रश्नोत्तरं नाही हे आजवरच्या इतिहासात कधी घडलं नाही. ठाकरे सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलंय", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन LIVE UPDATES
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाच्या पत्रिकेवरुनच सरकारला धारेवर धरलं. "अधिवेशनाच्या कामकाजाची पत्रिका काल रात्री दहा वाजले तरी तयार नव्हती. आजवर हे असं कधी घडलं नाही. इतका कसला गुप्त कारभार सरकारला करायचाय?", असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी निशाणा साधला.
MPSC वर चर्चा करा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.