नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:56 AM2024-10-21T08:56:55+5:302024-10-21T08:58:30+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कालिदास कोळंबकर तीन वेळा वडाळ्यातून तर पाच वेळा नायगावमधून आमदार राहिले आहेत. 

maharashtra vidhan sabha assembly election Kalidas Kolamabkar bjp candidate from wadala | नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करून बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व १० मंत्र्यांना व विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. तसेच, १३ महिलांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना भाजपनं रिंगणात उतरवलं आहे. कालिदास कोळंबकर तीन वेळा वडाळ्यातून तर पाच वेळा नायगावमधून आमदार राहिले आहेत. 

कालिदास कोळंबकर हे भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवसेनेपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरुवात झाली असून नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी कालिदास कोळंबकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत कालिदास कोळंबकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा पोटनिवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. ज्या-ज्या वेळी नारायण राणे यांनी पक्ष सोडला, त्या-त्या वेळी कालिदास कोळंबकर यांनी त्यांना साथ दिली. 

दरम्यान, कालिदास कोळंबकर यांनी सलग आठ वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. १९९० ते २००४ या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली होती. कालिदास कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. त्यानंतर २००६ ते २०१४ दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोलिदास कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. २०१४ मध्ये कालिदास कोळंबकर यांनी भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता. यानंतर कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१९ मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली होता. आता कालिदास कोळंबकर हे भाजपकडून नवव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Web Title: maharashtra vidhan sabha assembly election Kalidas Kolamabkar bjp candidate from wadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.