Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 05:11 PM2024-11-08T17:11:12+5:302024-11-08T17:17:35+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथील सभेतून विरोधकांवर निशाणा साधला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आजपासून महाराष्ट्रात प्रचारसभांना सुरुवात केली आहे. शाह यांनी आज पहिलीच जाहीर सभा सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घेतली. या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तर दुसरीकडे अमित शाह यांनी या सभेत शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिराळा येथील सभेत बोलताना म्हणाले, 'समर्थ रामदास यांचे चरण जिथे पडले ती ही भूमी आहे. गुलामीकाळात रामदासांनी तरुणांना एकत्र करुन शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले', अस वक्तव्य शाह यांनी केले. या वक्तव्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना तुम्ही जर जोडलं किंबहुना आणि कोणी त्यांना गुरु म्हणत आहेत तस होऊ शकत नाही. शिवाजी महाराज यांचे एकच गुरु ते आहेत जिजाऊ माँसाहेब म्हणून त्यांच महत्व आहे त्या ठिकाणी असाव. त्यांच्या महत्वाला आम्ही चॅलेंज करत नाही,पण शिवाजी महाराज यांना जोडायचं हे न पटणार आहे, असं सांगत माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला आहे.
अमोल मिटकरींनी ट्विट करुन टोला लगावला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही केंद्रीय मंत्री मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आमदार मिटकरी यांनी ट्विट करुन टीका केली. मिटकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'शिराळा येथील सभेत केंद्रीय मंत्री अमितजी शहा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली हे शोधलं पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलू नये, असा सल्लाही मिटकरींनी दिला.
शिराळा येथील सभेत केंद्रीय मंत्री श्री अमितजी शहा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहुन दिली हे शोधलं पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलु नये.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 8, 2024