Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाऊ-बहिणीच्या २,भावांच्या ३ जोड्या विजयी; नातेवाईक असलेले अनेक नेते जिंकले

By यदू जोशी | Published: November 24, 2024 10:00 AM2024-11-24T10:00:42+5:302024-11-24T10:01:55+5:30

महायुतीच्या घराणेशाहीला मतदारांची पसंती; थोरातांचे भाचेजावई हरले, वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पुत्र आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: 2 pairs of siblings, 3 pairs of brothers won in Assembly; Many leaders who are relatives won | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाऊ-बहिणीच्या २,भावांच्या ३ जोड्या विजयी; नातेवाईक असलेले अनेक नेते जिंकले

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भावांच्या तीन जोड्या आणि भाऊ-बहिणींच्या दोन जोड्या  विधानसभेत पोहोचल्या आहेत. त्यातील सर्व जण महायुतीतील पक्षांचे उमेदवार होते. महायुतीच्या घराणेशाहीला मतदारांनी पसंती दिली. माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणवकवलीतून, तर त्यांचे सख्खे भाऊ नीलेश राणे (शिंदेसेना) कुडाळमधून जिंकले. आता राणेंच्या घरात ते स्वत: खासदार आणि दोन मुले आमदार अशी सत्ता आली आहे. 

उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरीतून जिंकले, तर त्यांचे बंधू किरण सामंत याच जिल्ह्याच्या राजापूरमधून विजयी झाले. दोघेही शिंदेसेनेकडून लढले. वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पुत्र आहेत. उद्धव यांचे पुत्र आदित्य हे वरळीतून जिंकले.
त्यामुळे आदित्य आणि वरुण ही मावसभावांची जोडी विधानसभेत पोहोचली आहे. बहीण विदर्भातून तर भाऊ पश्चिम महाराष्ट्रातून जिंकल्याचेही उदाहरण आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट)  हे आंबेगावमधून (जि.पुणे) जिंकले, तर त्यांच्या भगिनी सईताई डहाके या कारंजामधून भाजपकडून जिंकल्या. 

वडिलांविरुद्ध मुलगी हरली, बहिणीविरुद्ध भाऊ जिंकला
गडचिरोलीच्या अहेरी मतदारसंघात मंत्री धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट) यांनी त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा पराभव केला, तसेच अपक्ष लढलेले त्यांचे पुतणे अंबरिशराजे आत्रामही हरले. नांदेडच्या लोहामध्ये माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (अजित पवार गट) यांनी त्यांची सख्खी बहीण आशा शिंदे यांचा पराभव केला. 

चव्हाण, तटकरे यांच्या कन्यांचा दिमाखदार विजय
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया (भाजप) यांनी भोकर या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात विजय मिळविला. ही जागा चव्हाण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या कन्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे श्रीवर्धनमधून जिंकल्या. 

गावितांच्या घरातून एकालाच मिळाली संधी
आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमधून दणदणीत विजय मिळविला, पण त्यांचे दोन भाऊ राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस) हे शहाद्यातून तर शरद गावित (अपक्ष) हे नवापूरमधून हरले. डॉ.गावित यांच्या कन्या डॉ.हीना गावित अक्कलकुवामध्ये पराभूत झाल्या.

दानवेंना डबल गिफ्ट मुलगा, मुलगीही जिंकले
माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष हे भोकरदनमधून पुन्हा विजयी झाले. रावसाहेबांच्या कन्या संजना या शिंदेसेनेकडून कन्नडमधून विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीत स्वत: दानवे पराभूत झाले होते, पण आज त्यांना डबल गिफ्ट मिळाले.

भावांच्या दोन जोड्यांपैकी एकेकाचा झाला पराभव
लातूर शहरातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित (काँग्रेस) जिंकले, पण लातूर ग्रामीणमध्ये त्यांचे बंधू व विद्यमान आमदार धीरज (काँग्रेस) यांचा भाजपचे रमेश कराड यांनी पराभव केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून जिंकले, पण त्यांचे भाऊ  विनोद शेलार मालाड पश्चिममध्ये हरले. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल हे काटोलमधून हरले. मात्र, त्यांचे पुतणे आशिष देशमुख सावनेरमधून जिंकले. अनिल देशमुख यांचे सख्खे भाचे खा. अमर काळेंच्या पत्नी मयुरा आर्वीमधून हरल्या. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर वसईतून तर मुलगा क्षितिज नालासोपाऱ्यातून हरले.
मंत्री छगन भुजबळ येवल्यातून जिंकले, मात्र त्यांचे पुतणे समीर भुजबळ नांदगावमधून पराभूत झाले.

कुठे काय घडले?

  • चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांचा वरोरामध्ये दारुण पराभव.
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस) नायगावमधून पराभूत. पाचोरामध्ये विद्यमान आमदार किशोर पाटील (शिंदेसेना) यांनी त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी (उद्धवसेना) यांना पराभूत केले. 
  • अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे पुसदमधून जिंकले, पण त्यांचे भाऊ ययाती (अपक्ष) यांचा कारंजात पराभव झाला. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर (काँग्रेस) वर्धेतून हरले. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप धामणगावमधून जिंकले. 
  • काका-पुतण्याच्या बारामतीतील लढाईत पुतण्या युगेंद्रचा दारुण पराभव झाला, अजित पवार जिंकले. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आकाश हे खामगावमधून पुन्हा जिंकले. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांचे आतेभाऊ रणधीर सावरकर (भाजप) अकोला पूर्वमधून जिंकले.

 

सख्खे साडूही जिंकले

इस्लामपूरमधून शरद पवार गटाचे जयंत पाटील जिंकले आणि त्यांचे सख्खे साडू सत्यजीत कदम (भाजप) यांनी शिराळामधून बाजी मारली. जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांचा मात्र राहुरीतून पराभव झाला. 
अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके (शरद पवार गट-पारनेर) यांना पराभव पत्करावा लागला. 
नेवासामध्ये शिंदेसेनेचे विठ्ठल लंघे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख (उद्धवसेना) यांचा पराभव केला. गडाख हे संगमनेरमधून पराभूत झालेले बाळासाहेब थोरात यांचे भाचेजावई आहेत. 

वडील खासदार, मुलगा आमदार

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे (शिंदेसेना) हे पैठणमधून जिंकले. घराण्याची राजकीय पार्श्वभूमी असलेले शिवेंद्रराजे भोसले (भाजप-सातारा), संदीप क्षीरसागर (शरद पवार गट-बीड), रोहित पाटील (शरद पवार गट-तासगाव कवठेमहांकाळ), सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे-भाजप), सुहास बाबर (खानापूर-शिंदेसेना), राहुल आहेर (चांदवड-भाजप) विधानसभेत पोहोचले. 

वडील जिंकले, मुलगा हरला, सासरे अन् जावईही जिंकले

माजी मंत्री गणेश नाईक (भाजप) हे ऐरोलीतून जिंकले, पण त्यांचे पुत्र संदीप नाईक (शरद पवार गट) यांचा मात्र बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. भाजपचे शिवाजीराव कर्डिले राहुरीमधून जिंकले, तर त्यांचे जावई संग्राम जगताप (अजित पवार गट) यांनी अहमदनगर शहरमधून विजयाची परंपरा कायम राखली.  

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: 2 pairs of siblings, 3 pairs of brothers won in Assembly; Many leaders who are relatives won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.