कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 06:08 AM2024-11-29T06:08:45+5:302024-11-29T06:09:10+5:30

आचारसंहिता संपल्यानंतरच विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येते. मात्र, दोन दिवस उलटूनही कोणत्याच उमेदवाराने विजयी मिरवणूक न काढल्याने चर्चांना उधाण आले आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: After results the code of conduct is over, but there is no victory rally by wining candidate | कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 

कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 

या रावजी... तुम्ही बसा भावजी

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात मृदगंध पुरस्कार सोहळा झाला. यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना सन्मानित केले. पुणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या खास ठसक्यात ‘या रावजी... बसा भावजी’ ही लावणी सादर केली. बसा भावजी म्हणताच व्यासपीठावर उपस्थित अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या आपल्या बाजूला बसलेले आपले पती आदेश बांदेकर यांच्याकडे पाहून हसल्या. हे उपस्थित प्रेक्षकांच्या लक्षात आल्याने तेही खळखळून हसू लागले. मात्र, पुणेकर यांच्या सुरूवातीला हे लक्षात आलं नाही. पण बांदेकर हे भावोजी असल्याचे पुणेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा मुखडा सादर केला. ‘बसा भावजी’ असे म्हणताना आदेश यांच्याकडे पाहून इशारा केल्यावर खसखस पिकली.

निवडणुकीत बाप से बेटी सवाई

वसई - विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व कमी करण्याचे आजवर अनेकदा प्रयत्न झाले, मात्र गेली ३५ वर्षे हितेंद्र ठाकूर यांचीच ‘ठाकूरशाही’ चालत होती. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला शह बसला आहे. २००९ मध्ये वसईत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून बविआच्या मतदारसंघात विजय मिळवला होता, मात्र २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर स्वतः पंडित यांच्याविरोधात उभे राहिले आणि जिंकले. पंडित हरले. आता १० वर्षांनी पंडित यांची कन्या स्नेहा पंडित-दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले आहे. त्यावरून पित्याला जे जमले नाही, ते कन्येने करून दाखविले, अशी चर्चा वसई-विरार परिसरात सुरू आहे

विजयी झाले; मिरवणूक नाही

विधानसभेचे निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले आहेत. आचारसंहिताही संपली. आचारसंहिता संपल्यानंतरच विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येते. मात्र, दोन दिवस उलटूनही कोणत्याच उमेदवाराने विजयी मिरवणूक न काढल्याने चर्चांना उधाण आले आहे. उद्धवसेनेच्या २० पैकी १० जागा मुंबईतील आहेत. अपयशामुळे मातोश्रीवर चिंतेचे सावट असल्यामुळे विजयी उमेदवारांची कोंडी झाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय झालेला नाही. शिंदेसेनेचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे विजयी झालो पण विजयोत्सव साजरा करता येत नाही, अशी उमेदवारांची अवस्था झाल्याची चर्चा आहे. 

डमी उमेदवार मंदा म्हात्रेही भारी

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही बेलापूरच्या निकालाबद्दल चर्वितचर्वण सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मंदा म्हात्रे जिंकणार की संदीप नाईक यावर  चर्चा होत होती. अखेर ३७७ मतांच्या फरकाने म्हात्रे यांनी विजय मिळविला. निवडणुकीमध्ये म्हात्रे आणि नाईक यांचे नामसाधर्म्य असणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज भरले होते. एकच नाव असल्यामुळे मतांची विभागणी होईल, यासाठी हे अर्ज भरले होते.  या दोघांपैकी कोणाला जास्त मते मिळणार, याकडेही लक्ष लागले होते. यात अपक्ष मंदा म्हात्रे यांना ५५७ मते मिळाली असून संदीप नाईक यांना ५१३ मते मिळाली आहेत. डमी उमेदवारांमध्येही म्हात्रे भारी पडल्याची चर्चा शहरभर आहे.

(कुजबुजसाठी जगदीश भोवड, महेश पवार, नामदेव मोरे, प्रज्ञा म्हात्रे यांनी लेखन केले आहे.)

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: After results the code of conduct is over, but there is no victory rally by wining candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.