"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 05:29 PM2024-11-23T17:29:10+5:302024-11-23T17:39:37+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Assembly Election 2024 Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. देशभरातून महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला १०० ही जागा मिळवता आलेल्या नाहीत. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीला मिळालेल्या जागांवरुन खिल्ली उडवली आहे. तसेच सगळा देश एकजूटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिलं असल्याचे योगींनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. अनपेक्षित असा निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे महायुतीने या निवडणुकीत प्रचंड ऐतिहासिक असं बहुमत मिळवलं आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ यांनी बचेंगे तो कटोंगे अशी घोषणा दिली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनीही या घोषणेचा पुनरुच्चार केला होता. त्यानंतर निकाल हाती येताच योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.
"देशाचे निकाल आमच्या बाजूने आहेत. हेच महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. प्रचंड असा विजय भाजप आणि महायुतीला मिळाला आहे. हा जनादेश म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नव्या भारताच्या नव्या महाराष्ट्रावर उमटवलेली मोहोर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा हा पराभव आहे. महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत तेवढ्या सगळ्या महाविकास आघाडीलाही मिळाल्या नाहीत. आज हे स्पष्ट झालं आहे की देशांच्या लोकांना मोदींचे नेतृत्व आणि त्यांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. या देशाने पंतप्रधान मोदींना नेता मानलं आहे. सगळा देश एकजूटीने त्यांच्यासोबत असल्याचे निवडणुकांच्या निकालांनी दाखवून दिलं आहे," असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या नऊ जागांपैकी सहा जागांवर भाजपने बाजी मारली आहे. तर एक जागा भाजपाचा मित्रपक्ष आरएलडीने जिंकली आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देणाऱ्या समाजवादी पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.