Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 05:52 AM2024-11-26T05:52:02+5:302024-11-26T05:52:47+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: पक्षाने भाजपसोबत जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मते उमेदवारांनी व्यक्त केली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत न जाता भाजपसोबत गेल्याचा पक्षाला मोठा फटका बसला, अशी नाराजी पराभूत उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर सोमवारी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेने विधानसभा निवडणुकीत १२८ उमेदवार उभे केले होते. मात्र, सर्वच उमेदवार पराभूत झाल्याने पक्षाची मान्यता रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी नेत्यांची मते जाणून घेतली. यावेळी सगळ्या उमेदवारांनी इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केला. पक्षाने भाजपसोबत जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मते उमेदवारांनी व्यक्त केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी काय भूमिका घ्यावी, यावरही विचारमंथन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजू पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल
पराभवाचा दुपटीने वचपा महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला काढायचा आहे. माझ्यावर आणि राज ठाकरेंवर विश्वास ठेवा, असा विरोधकांना इशारा देणारा आणि कार्यकर्त्यांना आवाहन करणारा मनसेचे नेते राजू पाटील यांचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला.