Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:25 AM2024-11-25T05:25:28+5:302024-11-25T05:26:57+5:30

उद्धवसेनेच्या उमेदवारामुळे मनसेचा एकमेव आमदारही पराभूत, कल्याणला केलेली मदत कामी आली नाही

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Maha Vikas Aghadi suffers setback due to MNS candidate on 8 seats, while 3 major MNS candidates are defeated due to Eknath Shinde Sena, Raj Thackeray is upset with Eknath Shinde | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत

Key Highlights of Maharashtra Vidhan Sabha Election 2024

अतुल कुलकर्णी

मुंबई - राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळे मुंबई, ठाण्यातील ५४ जागांपैकी महाविकास आघाडीच्या ८, तर महायुतीच्या ४ उमेदवारांना पराभवाचा फटका बसला. त्यासोबत उद्धवसेनेच्या उमेदवारामुळे मनसेचेकल्याण ग्रामीणमधील एकमेव आमदार राजू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघात शिंदेसेनेने त्यांचा उमेदवार देऊ नये, असे संकेत मनसेकडून देण्यात आले होते. मात्र, तसे घडले नाही. मुंबई आणि ठाण्यात मनसेने ३९ उमेदवार उभे केले होते. मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते  आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधला फरक पाहिला तर मनसेची मते निर्णायक ठरल्याचे स्पष्ट होते. लोकांना मनसे हवी होती, असा कौल जनतेने दिला नाही. मात्र, चेंबूर, घाटकोपर पश्चिम, भांडुप पश्चिम आणि दहिसर या चार जागी उद्धवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.

या ठिकाणी मनसे उभी नसती तर कदाचित हे चारही उमेदवार निवडून आले असते. याच पद्धतीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मनसेने बेलापूर, शहापूर आणि अणुशक्तीनगर या तीन ठिकाणी उमेदवार दिले. या तिन्ही ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा कमी फरकाने शरद पवारांचे तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत. सायन कोळीवाडा या एकाच मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला मनसेमुळे जबरदस्त फटका बसला. वांद्रे पूर्व येथे अजित पवार राष्ट्रवादी, विक्रोळी येथे शिंदे यांची शिवसेना आणि कलिना व वर्सोवा येथे भाजपच्या दोन उमेदवारांना मनसेच्या उमेदवारांमुळे फटका बसला. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेसेनेने उमेदवार उभा केल्याचा फटका मनसेचे एकमेव आ. राजू पाटील यांना बसला. त्यात त्यांचा पराभव झाला. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, मावळ अशा ६७ विधानसभा मतदारसंघात मनसेने ४९ उमेदवार उभे केले होते. मात्र, १२ ठिकाणी त्यांचा फटका इतरांना बसला. अन्यत्र मनसेचे उमेदवार फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. एकाही मनसे उमेदवाराला आपले डिपॉझिट राखता आले नाही. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे उमेदवार निवडून येतील, अशी राज ठाकरे यांना खात्री होती. मात्र, त्या ठिकाणी राजू पाटील यांच्या विरोधात शिंदेसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यात राजेश मोरे विजयी झाले. लोकसभेच्या वेळी राजू पाटील यांनी शिंदेसेनेचे उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मनापासून काम केले. त्याचा श्रीकांत शिंदे यांना फायदाही झाला होता. त्यामुळे आता विधानसभेला या मतदारसंघात शिंदेसेनेने उमेदवार देऊ नये, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. 

याचप्रमाणे माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले होते. भाजपाने त्या ठिकाणी मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, येथेही शिंदेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली. त्याचा थेट फटका अमित ठाकरे यांना बसला. ते उभे राहिले नसते तर अमित ठाकरे निवडून आले असते. या दोन्ही मतदारसंघांविषयी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राज ठाकरे यांना विचारले होते तेव्हा त्यांनी आमचीही कधी तरी वेळ येईलच, असे उत्तर दिले होते.

राज ठाकरे म्हणाले होते, जाणीव ठेवली पाहिजे!

काही गोष्टींचे संबंध जपणे खूप आवश्यक आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनी पाळली पाहिजे, असे माझे मत आहे. माझी ही चौथी - पाचवी निवडणूक आहे. शिंदे यांची पहिलीच निवडणूक आहे. याआधी ते फक्त ठाणे पाहात होते. महाराष्ट्र नाही. लोकसभेला भाजप, मनसेची मते त्यांना मिळाली, हे त्यांनी विसरू नये. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात मतभेद असताना मी ते मिटवले आणि राजू पाटील यांनी त्यांच्यासाठी मनापासून काम केले होते. मला असे वाटते की, काही गोष्टीच्या जाणीवा आपण ठेवल्या पाहिजेत. असे ठेवले नाही तर राजकारण हे बदलत असते. बदलत्या काळात पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्हालाही काही गोष्टींचा विचार करता येईल असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Maha Vikas Aghadi suffers setback due to MNS candidate on 8 seats, while 3 major MNS candidates are defeated due to Eknath Shinde Sena, Raj Thackeray is upset with Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.