मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 06:03 AM2024-11-25T06:03:18+5:302024-11-25T06:04:15+5:30

मुंबईतून मंत्रिपदे देताना ती मुख्यत्वे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जातील. या निवडणुकीत फायदा होईल, अशा चेहऱ्यांना मंत्रिपदे देण्याकडे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्त्चाचा कल असेल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Many names from Mumbai and Thane areas are in the discussion for ministerial posts, Mangalprabhat Lodha, Ravindra Chavan, Aditi Tatkare, Bharat Gogavale are likely to get ministerial posts | मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच

मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच

मुंबई - महामुंबईतून नवीन महायुती सरकारमध्ये कोण, कोण मंत्री होणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण (भाजप) व आदिती तटकरे (अजित पवार गट) हे तिघेच मंत्री होते. या तिघांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. 

एक लाखांहून अधिक मतांनी जिंकलेले प्रताप सरनाईक, पाचवेळचे आमदार दौलत दरोडा, गेल्यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले भरत गोगावले, बालाजी किणीकर यांची नावेही स्पर्धेत आहेत. भाजपकडून आमदार किसन कथोरे, आधीच्या फडणवीस सरकारमध्ये वा नंतरच्या महायुती सरकारमध्येही मंत्रिपद मिळू न शकलेले दिग्गज नेते गणेश नाईक, चौथ्यांदा जिंकलेले प्रशांत ठाकूर, ठाण्याचे संजय केळकर यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता आहे. 

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर

मुंबईतून मंत्रिपदे देताना ती मुख्यत्वे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिली जातील. या निवडणुकीत फायदा होईल, अशा चेहऱ्यांना मंत्रिपदे देण्याकडे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्त्चाचा कल असेल.  दुसरीकडे मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यासोबतच तब्बल नऊवेळा आमदार असलेले आणि एकदाही मंत्री होऊ न शकलेले कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावांचीही चर्चा आहे. शेलार यांना लगेच मंत्रिपद द्यायचे की पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडेच मुंबई भाजपची सूत्रे ठेवायची यापैकी एक निर्णय पक्षनेतृत्व घेईल. बहुजन आणि महिला चेहरा म्हणून दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी, जुने निष्ठावंत अतुल भातखळकर यांच्याही नावांची चर्चा आहे. 

शिंदेसेनेकडून चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे, मागाठाणेचे प्रकाश सुर्वे, कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. अजित पवार गटाकडून मुस्लिम व महिला चेहरा म्हणून सना मलिक यांचे नाव असेल. पण, त्या पहिल्यांदाच आमदार झाल्याने मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Many names from Mumbai and Thane areas are in the discussion for ministerial posts, Mangalprabhat Lodha, Ravindra Chavan, Aditi Tatkare, Bharat Gogavale are likely to get ministerial posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.