मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:26 AM2024-11-27T08:26:30+5:302024-11-27T10:01:59+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली, मतदान-मतमोजणीच्या आकड्यांत तफावतीच्या कुठेच तक्रारी नाहीत - निवडणूक आयोग

maharashtra vidhan sabha election 2024 results highlights, No complaints of discrepancy in polling-counting figures - Election Commission | मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

मुंबई : प्रत्यक्ष मतदानातील आकडेवारी व मतमोजणीतील आकडेवारी यात तफावत असल्याची कोणतीही तक्रार राज्यातील कोणत्याच बूथवर आलेली नव्हती. अत्यंत पारदर्शक पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राबविली गेली, असे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'लोकमत'ला सांगितले. या दोन आकड्यांमध्ये काही ठिकाणी तफावत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांनी प्रक्रियेबाबत माहिती दिली.

मतदान किती झाले, याची माहिती मतदान केंद्रांवर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना लेखी दिली जाते. प्रत्येकाच्या सह्या या आकडेवारीवर घेतल्या जातात. १७- क फॉर्मवर प्रत्येक बूथवरील मतदान नोंदी असतात. असे सर्व फॉर्म एकत्रितपणे सोबत घेऊनच प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर येतात. मतदानावेळी दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी सुरू करताना दिलेली आकडेवारी एकमेकांशी जुळते की नाही, याची खातरजमा केली जाते. तक्रार असल्यास निराकरण केल्याखेरीज पुढे मतमोजणी सुरू केली जात नाही, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

'मतदान व ईव्हीएमची मते कुठे जुळली नाही?', असे वृत्त 'लोकमत'ने सोमवारच्या अंकात दिले होते. यावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडली. एखाद्या ठिकाणी अशीही शक्यता आहे की, ईव्हीएममध्ये बिघाड होऊन डिस्प्ले जातो. अशावेळी ते मशिन बाजूला ठेवून अन्य मतमोजणी केली जाते. संपूर्ण मतमोजणीनंतर क्रमांक एकची मते मिळालेले व क्रमांक दोनची मते मिळालेले उमेदवार यांच्या मतातील फरक हा त्या डिस्प्ले नसलेल्या मशिनमधील मतांपेक्षा कितीतरी जास्त असेल, तर त्या मशिनमधील मते मोजली जात नाहीत. अर्थात हा निर्णय उमेदवारांच्या प्रतिनिधींची संमती घेतल्यानंतरच केला जातो. डिस्प्ले नसलेल्या मशिनमधील मते मोजण्याचीही सुविधा असते. या मशिनमधील व्हीव्ही पॅटच्या (मतदान केल्याची चिन्हांकित पावती) पावत्यांची मोजणी केली जाते, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

तफावत दिसण्याची काय काय असतात कारणे?

निवडणूक आकडेवारी तफावत संपल्यानंतर रात्री निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी माध्यमांना पाठविली जाते, पण ती आकडेवारी अंदाजित असते. जी आकडेवारी पाठविली जाते त्यातही ही आकडेवारी अंतिम नाही, असे स्पष्टपणे लिहिलेले असते. मात्र, मतदानाच्या दिवशी पाठवलेली आकडेवारी आणि निकालानंतर जारी झालेली आकडेवारी यात नियमानुसार केलेल्या कार्यवाहीमुळे तफावत असू शकते.

अशी तफावत दिसण्याची अन्य काही कारणेदेखील आहेत. मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाने एक निर्धारित कार्यपद्धती घालून दिलेली आहे. या कार्यपद्धतीमध्ये कोणकोणत्या कारणांमुळे ही तफावत दिसू शकते आणि त्याची तंत्रशुद्ध कारणे काय आहेत हेही स्पष्ट केली आहेत

मतदान सुरू करण्यापूर्वी सकाळी ६-७ या वेळेत मॉक पोल घेतला जातो. राजकीय पक्षाचे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. मात्र मतदान केंद्राध्यक्षांकडून मॉक पोलमधील मते एखादवेळी क्लिअर करायची राहून जातात आणि त्यावरच मतदान होते. मजमोजणीच्या वेळी हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन नियमानुसार मतमोजणी केली जाते असेही डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं. 

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 results highlights, No complaints of discrepancy in polling-counting figures - Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.