Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 09:47 AM2024-11-24T09:47:51+5:302024-11-24T09:48:44+5:30
अतुल लिमये, अरुण कुमार यांचे संघटन कौशल्य : मविआचे नॅरेटिव्ह खोडून काढले
योगेश पांडे
नागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला मिळालेल्या बंपर विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय जरी भाजपचा असला, तरी प्रत्यक्षात येथे पाया रोवण्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक व स्वयंसेवकांना जाते. लोकसभेतील पराभवानंतर संघाने सूत्रे हाती घेतली व नियोजन तसेच समन्वयात मौलिक भूमिका पार पाडली. विशेषतः सहसरकार्यवाह अतुल लिमये व अरुण कुमार यांच्या संघटन कौशल्याचे हे यश असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर, मुंबई येथे दोन्ही सहसरकार्यवाहांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित अंतराने समन्वय बैठका घेतल्या होत्या व पराभवाचे भाजपच्यादेखील निदर्शनास न आलेले मुद्दे समोर आणले होते. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात संघाकडून सातत्याने भाजप नेत्यांशी चर्चा करून सल्ला देण्यात येत होता. अतुल लिमये हे अगोदर पश्चिम क्षेत्र प्रचारक होते. संघटन कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अरुण कुमार यांची साथ मिळाल्याने दोघांनीही प्रभावी पद्धतीने यंत्रणा उभी केली.
मतदानवाढीत मौलिक वाटा
संघ स्वयंसेवकांकडून विविध वस्त्यांमध्ये जात लहान बैठका घेत संवाद साधण्यावर भर देण्यात आला. बहुतांश ठिकाणी भाजपचे नाव न घेता मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या मोठ्या कामगिरीचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी केला जात होता. राष्ट्रहितासाठी मतदान करण्याचे नेमके मतदान कुणाला करायचे, याचे संकेत दिले जात होते.
प्रचाराचा ट्रेंडच बदलला
निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात महायुतीकडून ओबीसी व जातींच्या आधारावर प्रचारावर भर देण्यात येत होता. मात्र, संघ परिवाराच्या सूचनांवरून भाजपने प्रचाराचा ट्रेंडच बदलला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणांच्या दिशेने प्रचार गेला. सोशल माध्यमांवर अखेरच्या १५ दिवसांत तर हा ट्रेंड फारच वेगात होता.
सोशल माध्यमांतून ‘फेक नॅरेटिव्ह’चे प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हचा भाजप-महायुतीला मोठा फटका बसला होता. या ‘फेक नॅरेटिव्ह’चा आम्ही प्रभावी पद्धतीने सामना करू शकलो नाही व आमची चूक झाली, हे फडणवीस यांनी संघधुरिणांसमोर कबूल केले होते.