Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: निकालाची आकडेवारी बोलते...; शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा पुन्हा बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:51 AM2024-11-25T09:51:19+5:302024-11-25T09:51:50+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: लोकसभेनंतर विधानसभेतही काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांमुळे झाले मतविभाजन
दीपक भातुसे
मुंबई : लोकसभा निवडणुकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळे शरद पवार गटाला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली होती. तर, इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखी उमेदवार असूनही ट्रम्पेट चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारो मते मिळाली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघांत झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय हा या ट्रम्पेट चिन्हामुळे शक्य झाला, असे आकडेवारीवरून म्हणता येऊ शकते.
इतर अपक्षांमुळे नुकसान
अकोले (जि. अहिल्यानगर) मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी ५,५५६ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी तब्बल ३२,७८३ मते घेतली. शेवगाव (जि. अहिल्यानगर) मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळेल यांनी शरद पवार गटाचे उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा १९,०४३ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी ४१,७८७ मते घेतली. माजलगाव (जि. बीड) मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५,८९९ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांनी ३८,९८१ मते घेतली आहेत.
ट्रम्पेटचा कुठे बसला फटका?
जिंतूर (परभणी) विजय भांबळे ४,५१६ ७,४३० मेघना बोर्डिकर (भाजप)
घनसावंगी (जालना) राजेश टोपे २,३०९ ४,८३० हिकमत उढाण (शिंदेसेना)
शहापूर (ठाणे) पांडुरंग बरोरा १,६७२ ३,८९२ दौलत दरोडा (अ.प.गट)
बेलापूर (ठाणे) संदीप नाईक ३७७ २८६० मंदा म्हात्रे (भाजप)
अणुशक्तीनगर (मुंबई) फाहद अहमद ३,३७८ ४,०७५ सना मलिक (अ.प.गट)
आंबेगाव (पुणे) देवदत्त निकम १,५२३ २,९६५ दिलीप वळसे पाटील (अ.प.गट)
पारनेर (अहिल्यानगर) राणी लंके १,५२६ ३,५८२ काशीनाथ दाते (अ.प.गट)
केज (बीड) पृथ्वीराज साठे २,६८७ ३,५५९ नमीता मुंदडा (भाजप)
परांडा (धाराशिव) राहुल मोटे १५०९ ४४४६ तानाजी सावंत (शिंदेसेना)
वंचितचाही बसला फटका
नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम यांनी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांचा ५,६३६ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेले अशोक ढोले यांनी ५,३११ मते घेतली, तर वंचितने ४,५१५ मते घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा ५,०१५ मतांनी पराभव केला. इथे ट्रम्पेट चिन्हावरील उमेदवाराने ३,४६७ तर वंचितने ८,८३९ मते घेतली.