'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:54 PM2024-11-23T15:54:08+5:302024-11-23T15:54:08+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights महिला या त्यांच्यासाठीच्या योजनांमुळे त्या त्या सरकारच्या तारणहार ठरू लागल्या आहेत. जातीपातीत असलेले व्होटबँकचे राजकारण यातून मागे पडू लागले असून महिला आता या राजकीय पक्षांच्या व्होटबँक ठरू लागल्या आहेत.
महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे जोरदार कमबॅक लाडक्या बहीण योजनेने शक्य केले आहे. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. मध्य प्रदेशनंतर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांनी महिला शक्तीच्या मदतीने काहीही शक्य होते, हे दाखवून दिले आहे. राज्यांतील सरकारे वाचविण्यासाठी 'ओ स्त्री! रक्षा करना' हाच एक सर्वात मोठा पावरफुल मंत्र ठरला आहे.
महिला या त्यांच्यासाठीच्या योजनांमुळे त्या त्या सरकारच्या तारणहार ठरू लागल्या आहेत. जातीपातीत असलेले व्होटबँकचे राजकारण यातून मागे पडू लागले असून महिला आता या राजकीय पक्षांच्या व्होटबँक ठरू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी असलेले पुरुषांच्या तुलनेत महिलांचे कमी मतदान अचानक बदलले आहे. याचा परिणाम राजकीय पक्षांना त्यांची सत्ता वाचविण्यासाठी झाला आहे.
पुरुष मतदार आणि महिला मतदारांच्या संख्येत फारसा फरक नाहीय. परंतू, मतदानाची टक्केवारी कमी होत होती. यावर शिवराजसिंह चौहान यांनी मोठा तोडगा शोधला आणि लाडक्या बहिणींसाठी योजना सुरु केली. तिथे यश मिळाल्यावर तीच योजना आता कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.
मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या काही दिवस आधी ही योजना लाँच झाली आणि गेमचेंजर ठरली. थेट खात्यात पैसे आल्याने मोठ्या प्रमाणावर महिलांनी मतदान केले. हीच रणनिती भाजपाने महाराष्ट्रात आणली. लोकसभेला विरोधात असलेले जनमत या एका योजनेने थेट सत्ता टिकविण्यात बदलले आहे. आता हे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करण्यात येणार आहेत.
झारखंडमध्येही ही योजना सरकार वाचविण्यात यशस्वी ठरली आहे. हेमंत सोरेन सरकार महिलांना दर महिन्याला १००० रुपये देत होती. ४ महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात वळते झाले होते. शाळेतील मुलींना मोफत सायकल, एक मुल असलेल्या महिलेला पैसे, बेरोजगारांना पैसे देणारी योजना सुरु करण्यात आल्या. याचा फायदा त्यांना त्यांचे सरकार वाचविण्यात झाला आहे.