Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:20 PM2024-11-13T17:20:47+5:302024-11-13T17:46:45+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होते, आता दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ते काही दिवस घरातून गायबही होते. वनगा ओक्साबोक्सी रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, एका मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्रीनिवास वनगा एकाच स्टेजवर आल्याचे पाहायला मिळाले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी पालघर दौऱ्यावर आले आहेत.यावेळी त्यांच्यासोबत आमदार श्रीनिवास वनगाही दिसले. यावेळी बोलताना शिंदे यांनी वनगा यांना श्रीनिवासचं चांगले होईल, त्याला इकडे तिकडे पाहायची गरज नाही, असा शब्दही दिला.
गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे वनगा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार की नाही या चर्चा होत्या. पण, आज पालघरच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी आमदार वनगा स्वत: उपस्थित राहिले होते. यानंतर त्यांनी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. आमदार वनगा या सभेसाठी उपस्थित असल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही. पण त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली. आम्ही उठाव केला तेव्हा श्रीनिवास माझ्यासोबत होता. आताही श्रीनिवासच्या घरचा कार्यक्रम होता. तो बाजूला ठेवून याच मार्गाने तो आमच्या सोबत आला. श्रीनिवास आता राजेंद्र गावित यांच्यासाठी व्यासपीठावर आहे, श्रीनिवासचं चांगलं होईल, त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.