Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 05:50 PM2024-10-19T17:50:51+5:302024-10-19T17:53:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचे सत्र अजूनही सुरु आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे काल सांगोला विधानसभा मतदारसंघातील दीपक साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत झालेल्या सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुरू आहे. शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
यामुळे आता सांगोला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी अडचण होऊ शकते. आज शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी देशमुख यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
बाबासाहेब देशमुख म्हणाले,लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या भेटी झाल्या, त्यावेळी शरद पवार यांची भावना आबासाहेबांनंतर देशमुख कुटुंबातील एक सदस्य विधानसभेत असावा अशी होती. ती निवडणूक आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी घेतली. आम्ही आबासाहेबांच्या ठिकाणी आजोबा या नात्याने पवार साहेबांना मानतो आणि पवार साहेब दिलेल्या शब्दाला तडा जाऊ देणार नाहीत अशी मला खात्री आहे, असंही शेकाप नेते बाबासाहेब देशमुख म्हणाले.
"महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणून त्याबद्दल आताच भाष्य करणे योग्य नाही. पण महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाला सांगोला विधानसभेची जागा सुटत नसेल तर निश्चितपणे तिथला केडर निर्णय घेईल. कालच केडरने निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी ती जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगोला मतदारसंघावर शेकापचा झेंडा फडकवायचा असं कार्यकर्त्यांनी ठरवलं असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
"आम्हाला जयंत पाटील भाई यांनी सांगोला लढवण्याचा विश्वास दिला आहे. आम्ही ही निवडणूक लढवणारच आहे, असंही देशमुख म्हणाले. पाटील यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा करत आहेत. अपेक्षित जागा आम्हाला सोडल्या नाहीतर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.