Maharashtra Election 2024: वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? बदलू शकतात अनेक ठिकाणची समीकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 09:02 AM2024-11-21T09:02:22+5:302024-11-21T09:04:04+5:30
Maharashtra Election Updates: सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत.
मुंबई : २०१९ च्या तुलनेत अनेक मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारणे व त्या वाढीव मतटक्क्यांचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाढीव मतदान सत्तारुढ महायुतीला फटका देईल की, महाविकास आघाडीला याबद्दल वेगवेगळे तर्क दिले जात आहेत.
सरकारच्या विरोधात लाट होती, त्याचा फटका महायुतीला बसेल, असे मविआच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, एक्झिट पोलचे आकडे काहीही येऊ द्या, जिंकणार आम्हीच असे महायुतीचे नेते सांगत आहेत.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचा निश्चितपणे आम्हालाच फायदा झालेला आहे. निकालात तो प्रतिबिंबित होईल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, सरकारविरोधात लाट असली तरच मतदान मोठ्या प्रमाणात वाढते, यावेळी तेच झाले असून निकालात दिसेल.
मतटक्का वाढण्याची अन्य कारणे कोणती?
अपक्ष व बंडखोर उमेदवार मोठ्या संख्येने होते, त्यामुळे मतटक्का वाढला.
जातीय समीकरणे खूपच तीव्र होती. आपापल्या जाती-समूहाच्या उमेदवारांना मतदान करण्याकडे कल दिसून आला.
निवडणूक आयोगासह विविध संघटनांनी मतटक्का वाढण्यासाठी प्रयत्न केले.
महायुतीचे दावे
लाडकी बहीण योजना, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, वीजबिल माफी, निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने यामुळे आमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले. प्रो-इन्कम्बन्सी होती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आखलेली रणनीती, लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणात केलेली मतदार नोंदणी याचा फायदा झाला आणि त्यामुळे वाढलेले मतदान आमचेच.
रा.स्व.संघ आणि भाजपच्या नेटवर्कने ‘आपले’ मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर काढले.
गेले तीन महिने भाजपने सूक्ष्म नियोजन केले. बाहेरील राज्यांमधील मोठ्या नेत्यांना मतदारसंघांची जबाबदारी दिली. लोकसभेतील खड्डे बुजविण्यात यश आले.
महाविकास आघाडीचे दावे
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीविरोधात लाट होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान झाले. तसेच, लाडकी बहीण आणि इतर निर्णय कसे फसवे आहेत, हे मतदारांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो.
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून नाराजी व्यक्त केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत भाजपने पाडलेली फूट मतदारांना पसंती नव्हती, त्यांनी महायुतीविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केले. अँटी इन्कम्बन्सी होती.
लोकसभेप्रमाणेच काँग्रेसमध्ये मोठा उत्साह होता, कुठेही आपसात वाद नव्हते, त्याचा फायदा झाला. शरद पवार यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.