'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 09:30 AM2024-11-24T09:30:04+5:302024-11-24T09:31:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही मोठा वाटा आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Bhupender Yadav Ashwini Vaishnaw played an important role in BJP's victory in Maharashtra, they also played a great role in Madhya Pradesh! | 'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. विधानसभेच्या २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. तसेच, महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. 

दरम्यान, भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचाही मोठा वाटा आहे. मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही पक्षाचा विजय निश्चित करण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षी यादव-वैष्णव जोडीला मध्य प्रदेशात भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी मध्य प्रदेशातील २३० पैकी १६३ जागा जिंकून पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली.

महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमानही भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाच्या खराब कामगिरीनंतर, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी राज्यात तळ ठोकला होता. अखेर त्यांच्या कामगिरीला यश मिळाले आहे. निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल समोर आल्यानंतर भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भूपेंद्र यादव यांचे अभिनंदन केले.

सर्व मंत्री जिंकले
महायुती सरकारमधील निवडणूक लढलेले सर्व मंत्री जिंकले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांचा त्यात समावेश आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोलेंना महायुतीचा शह!
२०१९ मधील मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार, त्यावेळी मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महायुतीने तडाखा दिला. आम्हीच सत्तेत येणार असे हे नेते दावा करत होते आणि मविआमधून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत दावे-प्रतिदावे करत होते. निकालाने मविआच्या स्वप्नांवर पाणी फेरले. मतमोजणीच्या पहिल्या तासापासून घेतलेली आघाडी महायुतीने वाढवत नेली आणि मविआ शेवटपर्यंत माघारलेलीच राहिली.

नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित हाेण्याची शक्यता आहे.महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरले नसले तरी शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. २०१४ मध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअमवर शपथ सोहळा आयोजित केला होता.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Bhupender Yadav Ashwini Vaishnaw played an important role in BJP's victory in Maharashtra, they also played a great role in Madhya Pradesh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.