"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:05 AM2024-11-23T07:05:45+5:302024-11-23T07:06:48+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काही मतमोजणी केंद्रांवर झालेला गोंधळ लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्रावर शेवटचे मत मोजून पूर्ण होईपर्यंत केंद्र सोडू नका, अशा स्पष्ट सूचना मविआतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असेल, अशाच पदाधिकाऱ्याची उमेदवाराचा पोलिंग एजंट म्हणून नियुक्ती करण्याची खबरदारी मविआने घेतली आहे.
ईव्हीएमवरील मतदान सुरू झालेली व संपलेली वेळ, तारीख, एकूण मतदार, झालेले मतदान, मशीनचा नोंदणी क्रमांक याची पडताळणी १७ सी फॉर्मनुसार तपासून पाहावी, मतमोजणी पूर्ण झाल्यावर फॉर्म १७ सी १ आणि सी २ वरील मतदानाचे आकडे पडताळून घ्या. टपाली मतदानाच्या मोजणीवर बारीक लक्ष ठेवा. कंट्रोल युनिटचे पिंक पेपर सील, ग्रीन सील तपासावे, मतमोजणी फेरी पूर्ण झाल्यानंतर आकडेवारी जुळून जाहीर झाल्याशिवाय पुढील फेरीची मतमोजणी सुरू होई देऊ नका, अशा सूचना पोलिंग एजंटना दिल्या आहेत.
थेट मुंबईला या
निवडून आल्यानंतर साधारणत: उमेदवाराची विजयी मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत बराच वेळ जातो. यावेळी मात्र निवडून आल्यानंतर मिरवणूक न काढता थेट मुंबईला येण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघात अपक्ष निवडून येत असेल, तर त्यांच्याशी संपर्क करून त्याला मविआच्या बाजूने वळविण्यासाठी त्याची भेट घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे मविआतील एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.
‘स्पष्ट बहुमतासह मविआ सत्ता स्थापन करेल’
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह मविआ सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्रिपदावरून मविआत वाद नाही, निकालानंतर आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेसने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का, यावर चेन्नीथला म्हणाले, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत. त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही.