विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:10 PM2024-11-25T15:10:33+5:302024-11-25T15:11:13+5:30
नागपूर : विदर्भातील ६२ जागांपैकी तब्बल ४९ जागांवर महायुतीने विजय मिळवून महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. विजयाच्या या लाटेत ...
नागपूर : विदर्भातील ६२ जागांपैकी तब्बल ४९ जागांवर महायुतीने विजय मिळवून महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. विजयाच्या या लाटेत विदर्भातील १२ आमदारांनाही मतदारांना नाकारले आहे. त्यामध्ये पाच आमदार महायुतीचे आहेत, हे विशेष.
चंद्रपूरच्या राजुऱ्यात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे व स्वभापचे अॅड. वामनराव चटप यांच्यात विजयासाठी झुंज सुरू असतानाच भाजपचे देवराव भोंगळे यांनी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब करून आश्चर्याचा धक्का दिसला त्यांनी विद्यमान आमदार धोटे यांचा केलेला पराभव चांगलाच चर्चेत आला आहे.
अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात भाजपचे राजेश वानखडे व काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यात काट्याची लढत झाली. मात्र, वानखडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत ठाकूर यांना पराभूत केले.
अचलपूर मतदारसंघात चार वेळा विजयी झालेले माजी राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांचा भाजपचे प्रवीण तायडे यांनी १२१३१ मतांनी पराभव केला. मेळघाट मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी आमदार केवलराम काळे यांनी उच्चांकी १,४५,९७८ मते घेत काँग्रेसचे उमेदवार डॉ. हेमंत चिमोटे यांचा पराभव केला. येथे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना २५२८१ मते मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
वर्धेतील देवळी विधानसभा मतदारसंघात सलग २५ वर्षांपासून असलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपचे राजेश बकाने यांनी अखेर खिंडार पडले. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मंत्री रणजित कांबळे यांना पराभूत केले.
मलकापूर मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी २०१९ च्या पराभवाचा वचपा काढत काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांचा पराभव केला. सिंदखेड राजात नवख्या मनोज कायंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे देवेंद्र भुयार व राजकुमार पटेल यांचे डिपॉझिटही वाचले नाही.
महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका
विदर्भात महाविकास आघाडीची वाताहत होत असतानाच यवतमाळमध्ये भाजपाचे माजी मंत्री विद्यमान आमदार मदन येरावार यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांनी पराभूत करून यवतमाळमध्ये महायुतीला रोखले. २०१९ च्या निवडणुकीत अवघा २२५३ मतांनी झालेल्या पराभवाचा मांगूळकर यांनी वचपा त्यांनी काढला.
वणी मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय देरकर यांनी दोन टर्म आमदार राहिलेले भाजपचे संजीव रेड्डी बोदकूरवार यांना १५ हजार ५६० मताधिक्याने पराभूत केले.
मेहकरमध्ये सिद्धार्थ खरात यांनी तीन वेळा आमदार असलेले शिंदेसेनेचे डॉ. संजय रायमूलकर यांचा पराभव करून 'प्रताप'गडाला खिंडार पाडले.
गडचिरोलीच्या आरमोरीत काँग्रेसने भाजपचे पानिपत केले. तेथे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना काँग्रेसचे रामदास मसराम यांनी मात दिली. तब्बल दहा वर्षानंतर आरमोरीचा गड काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतला.
मोर्शी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचे उमेश यावलकर विजयी झाले. त्यांनी अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा पराभव केला.
या ७ आमदारांना उमेदवारी नव्हती
सात आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली होती त्यामध्ये कामठीचे टेकचंद सावरकर, आर्णीचे संदीप धुर्वे, उमरखेडचे नामदेव ससाणे, आर्वीचे दादाराव केंचे, गडचिरोलीचे डॉ. देवराव होळी, नागपूर मध्यमधील विकास कुंभारे, वाशिमचे लखन मलिक यांचा समावेश होता. त्यामुळे हे आमदार रिंगणात नव्हते. या आमदारांची समजूत काढत बंडखोरी टाळली.
अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा व कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. कारंजा पुन्हा भाजपने जिंकले, अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचा ३० वर्षांनंतर विजय झाला.