कदम-क्षीरसागर... शरद पवार कुणाला देणार तिकीट? मोहोळमध्ये हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:19 PM2024-08-26T18:19:27+5:302024-08-26T18:19:53+5:30
Maharashtra Vidhan Sabha elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघात हालचाली सुरू असून, मोहोळ मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी एका माजी आमदाराने प्रयत्न सुरू केले आहेत.
Mohol Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक सक्रीय झाल्याचे दिसत आहेत. मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा होत असतानाच एका माजी आमदाराने प्रयत्न सुरू केले आहेत. हे माजी आमदार म्हणजे रमेश कदम!रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पक्षाच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेतली. ही भेट उमेदवारीसाठीच होती, असे समजते.
मोहोळ मतदारसंघातून संजय क्षीरसागर हेही दावा करणार असल्याची चर्चा आहे. एकीकडून क्षीरसागर तर दुसरीकडून कदम तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची चर्चा
सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील अशी चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहे. यात मोहोळ मतदारसंघाचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
मोहोळमध्ये शरद पवार कुणावर विश्वास दाखवणार, हा मूळ प्रश्न आहे. कारण संजय क्षीरसागर हे आधीपासूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या शिव स्वराज्य यात्रेवेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत अप्रत्यक्षपणे उमेदवारीसाठी दावेदारी केली.
मोहोळमधून मागितली उमेदवारी
क्षीरसागर तयारी करत असताना आता रमेश कदम यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचीही वडाळ्यात जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीत कदमांनी मोहोळमधून उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे.