महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 'त्या' 7 जणांचं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:06 PM2019-10-24T23:06:59+5:302019-10-24T23:07:36+5:30
Maharashtra Election Result 2019 प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मंत्रिपदाचं आश्वासन
मुंबई: यंदाच्या निवडणुकीत आमच्यासमोर विरोधकच नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री जवळपास राज्यभर फिरले. अब की बार 200 पार अशी घोषणा महायुतीकडून देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात महायुतीची गाडी 160 च्या जवळपास पोहोचली. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहा जणांचा पराभव झाला. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेल्या सातपैकी चार जणांना जनतेनं नाकारलं.
मुख्यमंत्र्यांनी प्रचारादरम्यान सात जणांचा उल्लेख भावी मंत्री म्हणून केला. जनतेनं या उमेदवारांना निवडून द्यावं. मी त्यांना मंत्री करेन, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या 7 पैकी 4 उमेदवारांचा पराभव झाला. त्यामध्ये राम शिंदे, निलय नाईक, विजय शिवतारे, बाळा भेगडेंचा समावेश आहे. भाजपाच्या राम शिंदे यांचा कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी पराभव केला. पुसदमध्ये भाजपाचे उमेदवार निलय नाईक पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी त्यांचा पराभव केला.
भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांनादेखील पराभव पत्करावा लागला. मावळ मतदारसंघात त्यांना राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी मात दिली. तर पुरंदरमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी धक्का दिला. शिवतारेंनादेखील मंत्री करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं.
फडणवीस यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 7 पैकी 3 उमेदवारांना विजय मिळवता आला. त्यात जयकुमार गोरे, राहुल आहेर आणि राहुल कूल यांचा समावेश आहे. गोरे यांनी माण मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचा पराभव केला. तर राहुल आहेर चांदवडमधून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या शिरीषकुमार कोटवाल यांना पराभूत केलं. याशिवाय भाजपाचे राहुल कूल दौंडमधून विजयी झाले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचं आव्हान होतं.