महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 10:46 AM2019-10-28T10:46:44+5:302019-10-28T11:42:05+5:30
रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनला पोहोचणार
मुंबई: शिवसेना आणि भाजपानं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं दिसत आहे. मात्र यातूनही दोन्ही पक्षांनी दबावाचं राजकारण सुरू ठेवलं आहे. शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईचा महापौर असल्यापासून आपण दिवाळीच्या दुसऱ्या देण्यासाठी राज्यपालांची भेट घेत असल्याचं रावते यावेळी म्हणाले.
Mumbai: Shiv Sena leader Diwakar Raote arrives at Raj Bhavan to meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari pic.twitter.com/kwj6dWlNNA
— ANI (@ANI) October 28, 2019
थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीचा अजेंडा निश्चित नाही. मात्र या बैठकीत सरकार स्थापनेबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. 'मुख्यमंत्री राज्यपालांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती देऊन सरकार स्थापनेबद्दल चर्चा करतील,' असं या नेत्यानं सांगितलं.
शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या समान वाटपाची भूमिका मांडत भाजपानं याबद्दल लिखित आश्वासन द्यावं अशी मागणी केली. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं, यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवणाऱ्या भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्याचा विश्वास होता. मात्र प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 17 जागा कमी झाल्या. त्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेची आवश्यकता आहे.