महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:43 AM2019-10-28T07:43:05+5:302019-10-28T07:43:27+5:30
Maharashtra Election Result 2019: कोल्हापूरबद्दलच्या विधानामुळे पाटील सोशल मीडियावर ट्रोल
कोल्हापूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या कथित विधानामुळे चर्चेत आले आहेत. कोल्हापूरबद्दल केलेल्या विधानावरून रान उठल्यानंतर पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉट्स अपवर आलेला मेसेज वाचून दाखवला. त्यातल्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही, असं पाटील यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची कोल्हापुरात धूळधाण झाली. जिल्ह्यातले भाजपाचे दोन्ही आमदार पराभूत झाले. तर शिवसेनेलादेखील मोठा फटका बसला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या होमग्राऊंडवर महायुतीचा आणि विशेषत: त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाल्यानं सध्या चिंतन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक व्हॉट्स अप मेसेज वाचून दाखवला. त्यात भाजपानं गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी होती. 'सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूर सुधारणार नाही,' या वाक्यानं मेसेजचा शेवट झाला. याच वाक्यामुळे पाटील सोशल मीडियावर ट्रोल झाले.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेतल्या व्हॉट्स अप मेसेज आणि त्यातल्या शेवटच्या ओळीबद्दल स्पष्टीकरण दिलं. 'गेल्या ५ वर्षात काय करायचं राहिलं, हे आम्ही जनतेला विचारलं आहे. मी व्हॉट्स अप मेसेज पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. टोल आम्ही घालवला, विमानतळ सुरु केलं. मी त्या मेसेजमधले सकारात्मक मुद्दे मांडले. त्या मेसेजच्या शेवटी जे वाक्य होतं, त्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे. शेवटच्या वाक्यावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही,'