Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 08:16 AM2019-10-31T08:16:28+5:302019-10-31T08:17:13+5:30
Maharashtra Election Result 2019: शिवसेनेची कोणती खाती जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
- यदु जोशी
मुंबई: अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या अशी मागणी करत भाजपावर दबाव आणणाऱ्या शिवसेनेनं अखेर नरमाईची भूमिका घेतली आहे. भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे सहा कॅबिनेट, तर सात राज्यमंत्री आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद वाढवून देत शिवसेनेला एकूण 16 मंत्रिपदं दिली जातील. मात्र त्याचवेळी सध्या शिवसेनेकडे असलेली दोन खाती भाजपकडे जाणार आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेनेकडून कोणती खाती घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय निकाली काढला. याचवेळी भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 जागांची ऑफर देण्यात आली आहे. मात्र गृह, वित्त, नगरविकास आणि महसूल यापैकी कोणतंही खातं शिवसेनेला दिलं जाणार नाही. याचवेळी जलसंपदा, कृषी, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी दोन खाती देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मात्र ती देताना सध्या शिवसेनेकडे असलेली दोन खाती भाजपकडे जातील.
Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...
सध्या शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, परिवहन, उद्योग, जलसंधारण, रोजगार हमी अशी सहा कॅबिनेट मंत्रिपदं आहेत. याशिवाय शिवसेनेकडे सात राज्यमंत्रिपदंही आहेत. म्हणजेच शिवसेनेकडे एकूण 13 मंत्रिपदं आहेत. मात्र फडणवीस-2 मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिकची 3 मंत्रिपदं मिळू शकतात. विशेष म्हणजे यात उपमुख्यमंत्रिपदाचादेखील समावेश आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यास उत्सुक आहेत. आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्तेतील समन्वय अधिक चांगला होईल, असं त्यांना वाटतं.
Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...
नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती खाती?
राज्य मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांसह ४३ राहू शकते. भाजपच्या ऑफरनुसार शिवसेनेला १६ मंत्रिपदे दिल्यानंतर भाजपकडे २७ मंत्रिपदं उरतात. त्यातील चार ही भाजपच्या लहान मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजपचे २३, शिवसेनेचे १६ आणि लहान पक्षांचे चार मंत्री होतील. सध्या शिवसेनेचे १३ (राज्यमंत्र्यांसह) मंत्री आहेत. भाजपकडून सहा ते सात मंत्रिपदं तर शिवसेनेकडून तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील, अशी शक्यता आहे.