Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...
By यदू जोशी | Published: October 31, 2019 07:39 AM2019-10-31T07:39:17+5:302019-10-31T07:52:03+5:30
आदित्य उपमुख्यमंत्री व्हावेत यासाठी मुख्यमंत्री आग्रही
- यदु जोशी
मुंबई: सत्तेत समान वाटा द्या अशी मागणी करत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागणाऱ्या शिवसेनेचा सूर अखेर नरमला आहे. भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जावं अशी आग्रही भूमिका देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याची माहिती सूत्रांनी 'लोकमत'ला दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये, असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्याऐवजी सुभाष देसाई, एकनाथ शिंदेंना संधी देऊन ज्येष्ठत्वाचा मान राखला जावा, असं शिवसेनेतल्या अनेकांना वाटतं. याउलट मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जावं यासाठी आग्रही आहेत. आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्तेतील समन्वय अधिक चांगला होईल, असं त्यांना वाटतं.
Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...
आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद द्यायचंच असेल, तर त्याआधी ते सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना दिलं जावं, असं शिवसेनेतल्या एका गटाला वाटतं. देसाईंना सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारशी खळखळ होणार नाही, असं पक्षातील काहींना वाटतं. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि नंतर त्यांच्याऐवजी आदित्य यांना आणल्यास राजी-नाराजीचे सूर उमटू शकतात हे लक्षात घेता देसाई यांना संधी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे
एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासोबतच तानाजी सावंत यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तानाजी सावंत यांना शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं मंत्रिपद मिळालं आणि नंतर ते मातोश्रीच्या ज्या प्रकारे निकट गेले, त्यावरून त्यांचं नावही चर्चेत आहे. आदित्य यांना लगेच उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते, अशी शक्यतादेखील पक्षातील काहींनी वर्तवली आहे.