महाराष्ट्र निवडणूक 2019: 50-50चा फॉर्म्युला मान्य, पण...; फडणवीस यांची उद्धव ठाकरेंना नवी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 11:15 AM2019-11-03T11:15:56+5:302019-11-03T11:16:28+5:30
Maharashtra Election Result 2019: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकाल येऊन 9 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. विशेष म्हणजे राज्यातल्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नवा प्रस्ताव दिल्याचं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी शिवसेनेनं लावून धरली आहे. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उद्धव यांना नवी ऑफर दिली आहे. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असं आश्वासन नव्या प्रस्तावात देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जावी. याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशा मागण्या उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांच्याकडून उद्धव यांना हा नवा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना नवा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं दिसत आहे. फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारीदेखील त्यांनी दर्शवली आहे. पुढील दोन दिवसात फडणवीस आणि ठाकरे यांच्यात बैठक होऊ शकते. याआधी भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांचा प्रस्ताव दिला होता. तर भाजपा आणि महायुतीतल्या लहान पक्षांना 27 ते 29 मंत्रिपदं दिली जाणार होती.