महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 11:13 AM2019-11-05T11:13:20+5:302019-11-05T11:13:46+5:30
Maharashtra Election Result 2019: राजकीय वर्तुळात 'त्या' फाईलची चर्चा
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. मात्र सत्तापदांच्या वाटवावरुन शिवसेना, भाजपामध्ये दबावाचं राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत एकमेकांवर दबाव वाढवला. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या एका फाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. काल त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी घाईघाईत एक फाईल मागे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाकडे दिली. त्या फाईलमागे नेमकं काय आहे, याबद्दल अनेकदा विचारूनही राऊत यांनी उत्तर देणं टाळलं. त्या फाईलमध्ये महत्त्वाची कागदपत्रं असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं. फाईलमधल्या कागदपत्रांबद्दल योग्य वेळी बोलू असंदेखील ते म्हणाले.
संजय राऊत यांनी आज सकाळीदेखील पत्रकारांना संबोधित केलं. यावेळीही पत्रकारांनी त्यांना त्या फाईलबद्दल प्रश्न विचारले. त्यावर शिवसेनेकडे काय आहे ते सगळ्यांना माहितीय, असं उत्तर राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्याच आमदारांची यादी त्या फाईलमध्ये होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.