महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 09:09 AM2019-11-03T09:09:06+5:302019-11-03T09:15:07+5:30
Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून रस्सीखेच सुरुच
मुंबई: विधानसभेच्या निकालाला नऊ दिवस होऊन गेले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा काही सुटताना दिसत नाही. नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका, चर्चा जोरात सुरू आहेत. मात्र तरीही सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही. विशेष म्हणजे राज्यातील मतदारांनी महायुतीला अगदी स्पष्ट कौल दिलेला असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. शिवसेनेनं वारंवार 50-50 चा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चादेखील होताना दिसत नाही. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यावरून ओवेसींनी शिवसेनेला चिमटा काढला. हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? हे काय नवं बिस्कीट आहे का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
A Owaisi:What is this 50-50,is this a new biscuit?How much 50-50 will you do?Save something for Maharashtra's public.They (BJP&Shiv Sena) are not bothered about the destruction rain has caused in Satara. All they talk about is 50-50.What kind of 'Sabka Sath Sabka Vikas' is this? pic.twitter.com/Ct4DFRLnDp
— ANI (@ANI) November 3, 2019
शिवसेना, भाजपा 50-50 करणार. राज्यातल्या जनतेसाठीदेखील काहीतरी शिल्लक ठेवा. भाजपा, शिवसेनेला केवळ सत्ता स्थापनेत रस आहे. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची त्यांना चिंता नाही. त्यांचं फक्त 50-50 सुरू आहे. हा कोणत्या प्रकारचा 'सब का साथ सब का विकास' आहे, असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला. सत्ता वाटपाच्या चर्चेतलं वजन वाढवण्यासाठी सध्या शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आणि लहान पक्षांच्या उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यावर भाष्य करताना एमआयएम शिवसेना, भाजपापैकी कोणालाच पाठिंबा देणार नाही, असं ओवेसींनी स्पष्ट केलं.