महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:39 IST2019-10-25T11:33:49+5:302019-10-25T11:39:05+5:30
Maharashtra Election Result 2019: राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.

महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर
मुंबई - परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. विजयानंतर आपल्या कार्यर्त्यांसह धनंजय मुंडेंनी घर गाठलं. त्यावेळी मुंडेंसह त्यांच्या आईंनाही अश्रू अनावर झाले होते. माझा धनु जिकंला, माझा धनु निवडणूक आला म्हणत धनंजय मुंडेंच्या मातोश्रींना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी, धनंजय मुंडेंनी आईला जादू झप्पी देताना वातावरण अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
अंगावर पडलेला गुलाल, घामानं भिजलेलं शरीर, कपाळी लागलेला विजयी टीळा आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊ धनुभाऊ आपल्या आईंच्या दर्शनासाठी, माऊलीच्या आशीर्वादासाठी परळीतील आपल्या निवासस्थानी गेले. त्यावेळी, कित्येकांना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाहीत. विजयी मिरवणूक घेऊन आलेल्या आपल्या धनंजय मुंडेंना पाहाता, त्यांच्या मातोश्रींनी अश्रूंना वाट मोकळी केली. माझा धनु जिंकला म्हणत आईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यावेळी, हा भावूक क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी, धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णांच्या आठवणीही नकळत जागल्या. माय-लेकाच्या भेटीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, आपल्या पराभवानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, 'अनाकलनीय' असं वर्णन केलंय. परळी शहरातून 18 हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले.
धनंजय मुंडेंची विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली.