महाराष्ट्र निवडणूक निकालः सातारा जिल्ह्यात महाआघाडीची लाट; उदयनराजे भोसले पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:05 AM2019-10-24T11:05:03+5:302019-10-24T11:06:40+5:30
Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती
मुंबई - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. तर जिल्ह्यातील २०१४ निवडणुकीतील विजयी उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीस साताऱ्यातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना रणांगणात उतरवले. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये पहिल्या फेरीपासून श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली. यामध्ये पहिल्या फेरीत एक हजार, दुसऱ्या फेरीत दोन हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर आघाडी वाढतच गेली. ती पंधरा हजारांवर पोहोचली.
कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्या फेरीअखेर १,७०० मतांनी आघाडी घेतली. सातारा विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही २,०६९ मतांची आघाडी घेतली. जिल्ह्यात राष्ट्रवादी ४, भाजप १ आणि काँग्रेस आणि शिवसेना १ जागेवर आघाडीवर आहे.