महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:54 AM2019-10-30T10:54:56+5:302019-10-30T11:04:23+5:30
Maharashtra Election Result 2019: भाजपा, शिवसेनेत सुरू असलेल्या चढाओढीवर राष्ट्रवादीचं भाष्य
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा होत आला तरी महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. शिवसेना सत्तेच्या समान वाटपावर ठाम आहे. पण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजपानं स्पष्ट नकार दिला आहे. याच परिस्थितीवर एनसीपीचे प्रवक्ते क्लायड क्रास्टोंनी चित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
क्लायड क्रास्टोंनी एक चित्र ट्विट करत शिवसेना, भाजपातील सुंदोपसुंदीवर भाष्य केलं आहे. क्रास्टोंनी शिवसेना आणि भाजपाची निवडणूक चिन्हं वापरुन एक चित्र ट्विट केलं आहे. यामध्ये खाली भाजपाचं कमळ दाखवण्यात आलं आहे. तर वर काही अंतरावर शिवसेनेचा धनुष्यबाण रेखाटण्यात आला आहे. कमळाच्या वर असलेला धनुष्यबाण कमळाच्या दिशेनं रोखलेला आहे. 'एक म्हण आहे, डोक्यावर टांगती...' असं शीर्षक क्रास्टोंनी चित्राला दिलं आहे.
एक म्हण आहे, डोक्यावर टांगती...
— Clyde Crasto (@Clyde_Crasto) October 29, 2019
My Artwork#ElectionResults2019#MaharashtraAssemblyElections#MaharashtraElections2019#MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/ikuyRqdTnl
शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युलावरुन चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत सत्तेच्या समान वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत भाजपानं मुख्यमंत्रीबद्दल कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता, असा पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री असेन, असंदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.