महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 10:42 PM2019-10-25T22:42:14+5:302019-10-25T22:42:42+5:30

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं मत

Maharashtra Vidhan Sabha Result ncp leader chhagan bhujbal reacts on bjp and vba performance in election | महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

googlenewsNext

नाशिक: वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असती, तर विधानसभा निवडणुकीच्या निकालात वेगळं चित्र दिसलं असतं, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं. आम्ही वंचितसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेत सातत्य नव्हतं, असंदेखील ते म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे महाआघाडीला फटका बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाआघाडी राहिली असती, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असतं, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांचा सत्कार आज सायंकाळी राष्ट्रवादी भवनात करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

राज्यातील काही जागांवर आघाडीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. मतांची विभागणी टाळण्यासाठी निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आघाडीनं वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न केले. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेत सातत्य नव्हतं असं भुजबळ म्हणाले. वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत असती, तर वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं असं ते म्हणाले.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना अशी सत्ता स्थापन होऊ शकते का यावर भुजबळ यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा कोणत्याही प्रस्ताव शिवसेनेनं दिलेला नाही, असं भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. विधानसभेत विरोधी पक्ष नेता कोण असेल, हे पक्षाचे आमदार ठरवतील, असं सांगून आपण विरोधी पक्ष नेतेपद स्वतः मागणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result ncp leader chhagan bhujbal reacts on bjp and vba performance in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.