महाराष्ट्र निवडणूक 2019: हा तर रोहितला ओटीत घेणाऱ्या मातांचा विजय; रोहित पवार यांच्या आई भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:45 PM2019-10-25T16:45:41+5:302019-10-25T16:50:04+5:30
Maharashtra Election Result 2019: कर्जत जामखेडच्या जनतेचे रोहित यांच्या आईनं मानले आभार
अहमदनगर: भाजपाचे मंत्री प्रा. राम शिंदेंना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेसचेरोहित पवार जायंट किलर ठरले. कर्जत जामखेडमध्ये पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. यानंतर त्यांच्या मातोश्री सुनंदा राजेंद्र पवार यांचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी कर्जत जामखेडमधील जनतेचे आभार मानले आहेत.
'राजकारणातील हे रोहितचे सर्वात मोठे व जोखमीचे पाऊल होते. कर्जत-जामखेडला त्यांची सर्वात जास्त गरज असल्याचे रोहितला लक्षात आले आणि त्याने इथे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि तो जिंकलाही. मूळात, आजचा विजय हा रोहितचा नाही तर, त्या यशोदा मातांचा आहे, ज्यांनी रोहितला त्यांचा ओटीत घेतलं. आजचा विजय त्या वानर सेनेचा आहे, ज्यांनी निस्वार्थीपणे रोहितच्या पाठीमागे उभे राहिले आणि हा विजय त्या तरुणाचाही आहे, ज्यांनी दारूला झुगारून रोहितचे हात बळकट केले,' अशा शब्दांत सुनंदा पवार यांनी कर्जत जामखेडमधल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.
'मी, राजेंद्र दादा व आमचे पवार कुटुंबीय रोहितच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मित्रपक्ष, कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आणि माझ्या कर्जत-जमखेड ग्रामस्थ, महिला, बच्चेकंपनी, माझे तरुण युवक-युवती आपणा सर्वांचेच मनापासून आभार मानते. खरं तर आभार मानून मी आपणाला परकं करत नाही परंतु रोहितवर तुम्ही जे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि जो जिव्हाळा लावला त्याची मी आयुष्यभर ऋणी राहीन. तुमचं प्रेम रोहितवर सदैव बरसत राहू द्या हीच विनंती!,' अशा भावना सुनंदा यांनी व्यक्त केल्या आहेत.
कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. या मतदारसंघात चुरशीची लढाई होईल असा अंदाज होता. गेल्या 25 वर्षांपासून कर्जत जामखेडमध्ये भाजपाचं वर्चस्व होतं. मात्र तरीही रोहित यांनी राम शिंदेंचा तब्बल 43 हजार मतांनी पराभूत केला.