महाराष्ट्र निवडणूक निकालः पवारांची 'ती' सभा निर्णायक, उदयनराजेंना परतीच्या पावसाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:57 PM2019-10-24T12:57:42+5:302019-10-24T13:00:59+5:30
Maharashtra Election Result 2019: सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मात्र, साताऱ्यातील जनतेला उदयनराजेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळेच, शरद पवारांच्या पहिल्याच सभेला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामध्ये, तरुणाईचा सहभाग मोठा दिसून आला. तसेच, राज्यभरातील पवारांच्या दौऱ्यांना मिळणारी सहानुभूतीही साताऱ्यातील निवडणुकांमध्ये प्रभावी ठरली. श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे विश्वासू आणि जवळचे मित्र आहेत. त्यामुळेच, श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.
शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात श्रीनिवास पाटील यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. पवारांचं भाषण सुरू असताना साताऱ्यातील या सभेत मुसळधार पावसाने सभेला झोडपलं. त्यामध्ये पवारांवरही पावसाचा वर्षाव झाला. मात्र, निर्सगापुढेही नतमस्तक न होता, पवारांनी भरपावसात सभा घेतली. साताऱ्यासह महाराष्ट्रात पवारांच्या सभे क्लिप आणि फोटो व्हायरल झाले. तर, दिल्लीतही पवारांच्या सभेची चर्चा झाली. या सभेनंतर साताऱ्यात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच, फटका उदयनराजेंना बसला. त्यामुळे, पवारांची साताऱ्यातील सभा निर्णायक ठरली, असे म्हटले तर वावग ठरणार नाही.