'डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, पवारांकडून पंकजा मुंडे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 17:19 IST2019-10-25T15:51:23+5:302019-10-25T17:19:09+5:30
Maharashtra Election Result 2019: धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. धनंजय यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती.

'डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, पवारांकडून पंकजा मुंडे लक्ष्य
परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. परळीतील निकालावर पवारांनी सरळसरळ प्रतिक्रिया दिला. मात्र, यावेळी पंकजा मुंडेंना टोलाही लगावला. डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, असे म्हणत पवारांनी पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला आता लोकांमध्ये स्थान उरले नसल्याचे सूचवलंय.
धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. सुरुवातीपासूनच त्यांनी मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला जनतेनं लाथाडत निवडणुकीत धनंजय मुंडेंना कौल दिला. परळीतील या विजयावर भाष्य करताना पवारांनी पंकजा मुंडेंना लक्ष्य केलं.
परळी मतदारसंघाबाबत बोलताना, या विजयाची मला अपेक्षा होती. धनंजय मुंडेंचा विजय माझ्यासाठी आश्चर्यकारक निकाल नसल्याचे पवारांनी म्हटले. ज्यावेळी आपल्याकडे दाखवायला काम नसतं, तेव्हा डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं. आता, लोकांना हे पटत नाही, त्यामुळेच लोकांनी त्यांचा पराभव केला. मला संबंध महाराष्ट्राची नवीन पिढी राजकारणात आणायची आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या विजयाचा आनंद असून तो विजय होणारच होता, असे म्हणत शरद पवारांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान, पक्षांतराची नाराजी लोकांमध्ये दिसून आली, अपवादात्मक जागा सोडल्या तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी जागा जागावली. साताऱ्याच्या गादीचा आदर आहे. पण, त्या कुटंबातील लोकांनी गादीची प्रतिष्ठा जपली नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपा नेते उदयनराजे भोसलेंवर टीका केली.