महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 08:03 AM2019-11-03T08:03:46+5:302019-11-03T08:04:18+5:30
Maharashtra Election Result 2019 हरयाणातला तिढा सोडवणाऱ्या अमित शहांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष
मुंबई: हरयाणातील सत्तास्थापनेचा तिढा अवघ्या दोन दिवसांत सोडवणाऱ्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना महाराष्ट्रातील तिढ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची टीका करीत शिवसेनेनं आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, असं एकप्रकारे सूचित केलं आहे. भाजपाच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रातील तिढ्याकडे दुर्लक्ष केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राज्यात शिवसेना, भाजपानं एकत्र निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना स्पष्टपणे कौलही दिला. मात्र तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. याउलट हरयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीनं स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र तरीही तिथे निकालानंतर अवघ्या दोनच दिवसात दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने अमित शहा मुंबईत येऊन चर्चा करतील, अशी अपेक्षा होती पण, ते अद्याप आलेले नाहीत वा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरूनही चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकटे पडल्याचे दिसतात या राऊत यांच्या वाक्याचा अर्थ शिवसेनेला आता मध्यस्थीसाठी अमित शहाच हवेत आणि त्या शिवाय चर्चा केली जाणार नाही असा घेतला जात आहे.
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थी
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शिवसेनेकडून सतत होत असलेल्या टीकेमुळे मोदी, शहा याबाबतीत लक्ष घालत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, अशी भूमिका भाजपा श्रेष्ठींनी घेतल्याचं समजतं.
मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम
पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.
शिवसेना-भाजपामध्ये नेमकं काय आणि कधी बिनसलं?
दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद ठरलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेनं त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचं, महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळं काही अमित शहांबरोबरच बोलू, असं सांगत शिवसेनेनं भाजपला वेटिंगवर ठेवलं आहे.